नागपूर : तुम्ही वाहतुकीचे नियम मोडले असल्याचे सांगून तुमच्या व्हॉटसॲपवर ट्रॅफिक चालन आल्यास सतर्क होणे आवश्यक आहे. कारण, अशापप्रकारे व्हॉट्सॲप ट्रॅफिक चालन पाठवून नागपुरात फसवूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. सायबर गुन्हेगार आता व्हॉट्सॲपद्वारे पाठवलेल्या बनावट ट्रॅफिक चालानांचा वापर नागरिकांना लुबाडण्यासाठी करीत आहेत. कमलेश वर्मा (नाव बदलेले) नावाच्या एका व्यक्तीला त्याच्या मोबाईल फोनवर वाहतूक उल्लंघनाची सूचना आली. त्यांची गाडी त्याच्या घराबाहेर, पार्किंगमधून बाहेर पडली नसतानाही अशा प्रकारची सूचना त्यांच्या वॉट्सॲपवर आल्याने संशय आला आणि ते सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या जाळ्यातून थोडक्यात बचावाले.
सायबर गुन्हे करणारे आता बनावट लोगो, खरे दिसणारे संदेश आणि अगदी वैध वाहन नोंदणी क्रमांक वापरून वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची नक्कल करत आहेत. वर्मा म्हणाले, मला संध्याकाळी ५.१६ वाजता एक व्हॉट्सॲप मेसेज आला ज्यामध्ये मी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे आणि २००० रुपये दंड भरायचे आहे. त्यात माझ्या कारचा नंबर आणि चालान नंबर होता. पण मी दिवसभर माझी कार बाहेर काढली नाही. ती माझ्या घराबाहेर उभी होत. मी माझ्या पत्नीला याबाबत विचारले आणि घरी सीसीटीव्ही फुटेज पुन्हा पाहिले. माझी गाडी हलली नव्हती. बारकाईने तपासणी केल्यावर, वर्मा यांच्या लक्षात आले की मेसेजमध्ये एक एपीके फाइल होती. एक प्रकारची अँड्रॉइड ॲप्लिकेशन फाइल – जी त्याच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकते आणि बँक खात्याच्या तपशीलांसारखा संवेदनशील डेटा चोरू शकते. सुदैवाने, मी त्यावर क्लिक केले नाही. मी अशा घोटाळ्यांबद्दल बातम्या वाचल्या होत्या. हा बनावट संदेश एका अनोळखी नंबरवरून आला होता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी त्याने ट्रॅफिक पोलिसांचा अधिकृत प्रोफाइल फोटो देखील वापरला होता.
वर्मा म्हणाले, माझ्या एका मित्राला अलीकडेच टोल कलेक्शन सेवा आणि बँकांकडून असल्याचे भासवून असेच बनावट संदेश मिळाले. हे फसवणूक करणारे लोक लोकांना घाबरवण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी भावनात्मक ट्रिगर वापरत आहेत. दरम्यान, नागपूर पोलिसांना गेल्या काही आठवड्यात अशा अनेक तक्रारी मिळाल्या आहेत आणि ते नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. अशा फसवणक झालेल्यांनी तातडीने राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर कॉल करून आणि जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी दिला.