नागपूर : Cyclone Tej Alert Marathi News मान्सून परतला असतानाच दोन चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. अरबी समुद्रसोबतच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे. अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप परिसरात चक्राकार वारे तयार झाले असून २१ ऑक्टोबरला दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. मान्सूननंतरचे हे पहिले चक्रीवादळ असून सध्या ते ३० ते ४० किलोमीटर प्रतितास पुढे सरकत आहे. त्यामुळे या चक्रीवादळाला ‘तेज’ हे नाव देण्यात आले आहे.

अरबी समुद्रातील ‘तेज’ या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला कुठलाही धोका नाही. हे चक्रीवादळ पश्चिम-वायव्य दिशेला सरकत जाऊन ओमान ते येमेनच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. २३ ऑक्टोबरला येमेनच्या किनारपट्टीजवळ धडकण्याची शक्यता आहे. मात्र, ते तीव्र झाल्यानंतर दिशा बदलून गुजरात किंवा पाकिस्तानच्या दिशेने देखील जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरीही, चक्रीवादळ दिशा बदलण्याची शक्यता फारच कमी आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे.

हेही वाचा >>> Samruddhi Highway: देशातील सर्वाधिक रुंद आणि राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार; समृद्धी महामार्गाच्या १४ व्या पॅकेजचे काम पूर्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरबी समुद्रासोबतच बंगालचा उपसागर आणि लगतच्या अंदमानजवळ १७ ऑक्टोबरला चक्राकार वारे तयार झाले. हे चक्राकार वारे पश्चिम-उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाऊन २१ ऑक्टोबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरला पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ अधिक तीव्र असेल आणि याचा फटका भारतीय किनारपट्टीसोबतच बांगलादेशच्या किनारपट्टीलाही बसण्याची दाट शक्यता आहे. २४ ऑक्टोबरला ते विशाखापट्टणमजवळ धडकून पुढील २४ तास किनारपट्टी भागातूनच ओडिशा आणि बांगालदेशच्या दिशेने प्रवास करेल. त्यामुळे या चक्रीवादळाचा आंध्रप्रदेश आणि ओडिशाला सर्वाधिक फटका बसणार आहे.