बुलढाणा: पुरोगामी बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरवून सोडणारी खळबळजनक व तितकीच चीड आणणारा घटनाक्रम खामगाव शहरामध्ये घडला.काही कथित गोरक्षकांनी गाई चोरीच्या संशयावरून मध्यरात्री दलित युवकास दगड व लाता बुक्क्यानी बेदम मारहाण करून त्याला रक्तबंबाळ केले.
त्या युवकाच्या सुदैवाने मारहाण होत असताना पोलिसांची रात्र गस्तीचे वाहन घटनास्थळी पोहोचल्याने संभाव्य अनर्थ टळला. या प्रकरणी तिघा युवकाविरुद्ध ऍट्रासिटीसह भारतीय न्याय संहितेंच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे खामगाव शहरासह राजमाता जिजाऊचा जिल्हा हादरला आहे. दुसरीकडे या घटनेचे पडसाद जिल्ह्यासह राज्यात दूरवर उमटण्याची चिन्हे आहेत. रोहन संतोष पैठणकर( वय २१ वर्षे, राहणार शामल नगर, शेगाव रोड, खामगाव, जिल्हा बुलढाणा) असे अमानुष मारहाण करण्यात आलेल्या दलित युवकाचे नाव आहे. तो एका हॉटेल मध्ये वेटर चे काम करतो.
घटना प्रसंगी रोहन हा रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास खामगाव बस स्थानक जवळ मित्रांसोबत गप्पा मारत होता. यावेळी तिथे आलेल्या दोघांनी त्याला खामगाव शहरातील बस स्थानक परिसरातून आपल्या जवळील वाहनाने जवळच असलेल्या मोकळ्या मैदानात नेले. यावेळी या त्याला हाता पायांनी व दगडाने अमानुष मारहाण केली. त्याचे कपडे फाडले. त्याच्या अंगावर मोकाट गाया सोडून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले.
यानंतर त्याला खामगाव मधीलच घाटपुरी नाका परिसरातील दंडेस्वामी मंदिर परिसरात नेण्यात आले. तिथे आणखी एक युवक आला. या तिघानी रोहन ला पुन्हा क्रूरपणे मारहाण केली. यामुळे त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. आपण गाई चोर नसल्याचे विनवणी करून सांगत असताना देखील त्याला मारहाण करण्यात आली. दरम्यान त्याच वेळी योगायोगाने शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त वाहन घटना स्थळी जवळ आले. त्यांनी जायबंदी रोहनला उपचारासाठी हलविले.या मारहाणीत या तरुणाचा एक डोळा निकामी झाला असून नाकाचे हाड मोडले आहे. सध्या या तरूनावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
घटनेची माहिती वरिष्ठाना देण्यात आली. रोहनने आई रेखा पैठणकर यासह शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गब्बू गुजरिवाल (राहणार सजनपुरी, खामगाव), प्रशान्त गोपाल संगेले( गांधी ले आऊट खामगाव) आणि रोहित पगारिया ( बालाजी प्लॉट, खामगाव) याच्या विरुद्ध ऍक्ट्रोसिटी, भारतीय न्याय संहितेच्या विविध कसलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.दोन तरुणांना अटक केली आहे मात्र तिसरा अद्यापही फरार आहे. याप्रकरणी आता दलित संघटना आक्रमक झाल्या असून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार खामगाव येथे येऊन त्या तरुणाची भेट घेणार आहेत .