लहानपणी आई वडिलांसोबत पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घ्यायचो. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्या आराध्य देवतेची महापूजा करण्याचे भाग्य लाभले. हा माझ्या जीवनातील सुवर्ण क्षण ठरला. विठोबा माऊलींचे दर्शन घेऊन आल्याने कालच्या निकालाचा ताण नव्हता. आपल्या सर्वांच्या लाडक्या विठुरायानेही आपल्या भक्ताच्या बाजूने कौल दिला, असे भावपूर्ण प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
हेही वाचा >>> निकाल मान्य, पण नार्वेकर जे करणार… काँग्रेसचे आमदार स्पष्टच बोलले
बुलढाणा जिल्ह्याच्या इसरुळ (तालुका चिखली) येथील संत चोखोबारायांच्या मंदिराचे लोकार्पण आज शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. धार्मिक सोहळा असल्याने यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजकीय विषयांवर बोलण्याचे कटाक्षाने टाळले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अपेक्षेप्रमाणे बोलताना त्यांनी सूचक विधान केले. आपण जे केले ते कायद्याच्या चौकटीत राहूनच केले. काल मनासारखा निकाल लागला आणि आज संत शिरोमणी चोखोबा यांच्या चरणी नतमस्तक होण्याचे भाग्य लाभले. यामुळे मी स्वतःला भाग्यवान मानतो. इसरुळ येथील या मंदिरासाठी सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.