अकोला : राज्यात अतिवृष्टीचा वाशीम व नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, जनावरांचे मृत्यू, शेतीपिकांचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे.

या नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून दिली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. वाशीम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन झाल्यावर कृषिमंत्र्यांनी वाशीम येथे राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली. राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

राज्यातील ११ जिल्ह्यात १० हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. वाशीम, नांदेड जिल्ह्यांसोबतच अकोला, यवतमाळ, बुलढाणा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यांना देखील मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा संकटात सापडला. नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल आल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. वाशीम तालुक्यात ९८ गावे बाधित होऊन ३९ हजार ३१० हेक्टर क्षेत्रावर, रिसोड तालुक्यात ८५ गावे बाधित होऊन ४८ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रावर, मालेगाव तालुक्यात १२७ गावे बाधित होऊन ५० हजार ३११ हेक्टर क्षेत्रावर, मंगरूळपीर तालुक्यात ७४ गावे बाधित होऊन १० हजार ४८९ हेक्टर क्षेत्रावर, कारंजा तालुक्यात १ गाव बाधित होऊन ५.९९ हेक्टर क्षेत्रावर तर मानोरा तालुक्यात ६ गावे बाधित होऊन १८५ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.

३५ जनावरे आणि तीन हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. वाशीम जिल्ह्यात ४०४ घरांची अंशतः पडझड झाली आहे. जमिनीच्या नुकसानीत २२८ हेक्टर क्षेत्र खरडून गेले. या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांनी धैर्य सोडू नये. राज्य शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंचनामे तातडीने करून मदत व नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू असून यावर लक्ष ठेवून आहे. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे ते म्हणाले.

कृषिमंत्री बांधावर पोहोचले

कृषिमंत्र्यांनी वाशीम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी रिसोड तालुक्यातील महागाव, बाळखेड, वाकद, शेलूखडसे, पिंपरखेड, मसलापेन या गावांना, मालेगाव तालुक्यातील राजुरा या गावाला भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानाची पाहणी केली व शेतकऱ्यांची संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली.