भंडारा : शालेय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेत विद्यार्थ्याच्या जेवणात चक्क ‘विषारी गोम’ मृतावस्थेत आढळल्याची घटना भंडारा शहरातील नामांकित बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात सोमवारी (८ सप्टेंबर २०२५) उघडकीस आली. सुदैवाने एकाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र, या प्रकारातून शाळा व्यवस्थापनाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पालक वर्गामध्ये शाळा व्यवस्थापनाविषयी रोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या जेवणात ‘विषारी गोम’ आढळली तो इयत्ता दहावीचा विद्यार्थी असुन शासनाच्या निकषाप्रमाणे त्याला या मध्यान्ह आहार योजनेचा लाभ देता येत नाही.

शाळा व्यवस्थापनाने या संपुर्ण प्रकरणावर पडदा घालण्याचा कसुन प्रयत्न केला. याप्रकरणाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राठोड यांनी शाळेला भेट दिली असुन सविस्तर अहवाल शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना सादर केला जाणार आहे. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.शालेय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेत विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याच्या अनेक तक्रारी जिल्ह्यात आजपावेतो पुढे आल्या आहेत. या योजनेचा उद्देश शालेय विद्याार्थ्यांना पौष्टिक अन्न पुरवणे हा असला तरी प्रत्यक्षात मात्र दर्जाहीन, चवहीन आणि अपुरे जेवण मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची भीती पालक वर्गाकडुन व्यक्त केली जाते.

काय आहे प्रकरण….

प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी दुपारी २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान दर दिवशीप्रमाणे शाळेत मध्यान्ह भोजन वाटप सुरू होते. इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी हा जेवण करत असतांना त्याच्या जेवणात ‘विषारी गोम’ मृतावस्थेत आढळुन आली. त्याने लगेच हा प्रकार शाळेत उपस्थित शिक्षकांच्या लक्षात आणुन दिला. तोपर्यंत शंभर ते सव्वाशे विद्यार्थ्यांचे जेवण आटोपले होते. विद्यार्थ्यांच्या जेवणात विषारी गोम मृतावस्थेत आढळल्याने अन्न धान्याची योग्यरित्या स्वच्छता न राखल्याने विषारी गोम अन्नासोबत शिजल्या जाण्याची दाट शक्यता आहे. या प्रकारामुळे उपस्थित शिक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला. निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे विद्यार्थ्यांच्या पोटदुखी, उलट्या, अशक्तपणा अशा तक्रारी वाढल्याचे पालक सांगतात. मध्यान्ह भोजन हे गरीब व वंचित कुटुंबातील मुलांसाठी शिक्षणासोबत पोषण मिळवण्याचे प्रमुख साधन आहे. परंतु दर्जा खालावल्याने या योजनेचा मूळ हेतूच अपूर्ण राहतो आहे.

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

शालेय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणाºया मध्यान्ह भोजन योजनेत विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. शाळांमधील स्वयंपाकगृहांची नियमित तपासणी, गुणवत्तापूर्ण अन्नधान्याचा पुरवठा यासह इतरही बाबींची तपासणी होणे गरजेचे आहे मात्र तसे होतांना दिसुन येत नाही.

विद्यार्थी हा झाडाखाली जेवण करीत असल्याने सदर विषारी गोम हि झाडावरून विद्यार्थ्यांच्या ताटात पडली व अन्न गरम असल्याने ती मृत पावली. मात्र वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने उर्वरित अन्न तात्काळ फेकुण देण्यात आले.शाळा व्यवस्थापन, नुतन महाराष्ट्र विद्यालय, भंडारा

घटनेची माहिती मिळताच आम्ही सदर शाळेला तात्काळ भेट देत शाळेतील शिक्षक,आहार शिजविणाऱ्या महिला, मुख्याध्यापक तसेच सदर विद्यार्थी यांचे जबाब नोेंदविले. या प्रकरणात जो कुणी दोषी असेल त्याचेवर योग्य ती कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.राठोड, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती भंडारा.