नागपूर :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) पूर्व परीक्षेतील ‘सी-सॅट’चा पेपर केवळ पात्र करावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थीची आहे. आयोगही यासाठी सकारात्मक आहेत. मात्र, आयोगाला यासंदर्भात परस्पर निर्णय घेण्यास मर्यादा असल्याने अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली असून या तज्ज्ञ समितीकडून ‘सी-सॅट’ पेपरवर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेत देखील ‘सी-सॅट’ पेपर द्यावा लागतो. त्याच धर्तीवर ‘एमपीएससी’ने देखील ‘सी-सॅट’ पेपर सुरू केला. मात्र, ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना हा पेपर उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून हा पेपर केवळ पात्र करावा अशी मागणी केली जात आहे. आयोगाने यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी वेळूकर समितीची स्थापना केली होती. मात्र, समितीने ‘सी-सॅट’ उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याचा निर्णय दिला होता. समितीच्या या निर्णयानंतरही परीक्षार्थीचे समाधान न झाल्याने ‘सी-सॅट’संदर्भात वारंवार निवेदन देण्यात आले.

‘सी-सॅट’चा पेपर पात्र करण्यासंदर्भात आयोगही सकारात्मक आहे. मात्र, आयोग यासंदर्भात परस्पर निर्णय घेऊ शकत नसल्याने समितीच्या अहवालावरूनच ‘सी-सॅट’चा निर्णय घ्यावा लागणार होता. त्यामुळे एमपीएससीच्या बैठकीत अभ्यास मंडळाची स्थापना करण्यावर निर्णय झाला. हे अभ्यास मंडळ आता ‘सी-सॅट’ पात्र करावी की परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करावे याचा अभ्यास करणार आहे. या समितीच्या अहवालानंतर ‘सी-सॅट’वर निर्णय जाहीर केला जाणार आहे. आयोगाने अभ्यास मंडळालाही यावर लवकर अहवाल मागितला असून पुढे होणाऱ्या परीक्षांपासून ‘सी-सॅट’ संदर्भातील निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती

आहे.

‘सी-सॅट’ला विरोध का?

‘सी-सॅट’ परीक्षेमध्ये असणारा बहुतांश अभ्यासक्रम हा विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाशी निगडित असतो. त्यामुळे अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना हा पेपर सोपा जातो. तर कला आणि अन्य शाखेच्या विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होत असल्याची ओरड आहे. त्यामुळे उमेदवारांचा ‘सी-सॅट’ परीक्षेला विरोध नसला तरी तो उत्तीर्ण करणे अनिवार्य न करता केवळ पात्र ठेवावा अशी मागणी आहे.

‘सी-सॅट’ परीक्षेच्या निर्णयासाठी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली असून समितीच्या अहवालानंतर यावर निर्णय घेतला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– स्वाती म्हसे पाटील, सचिव एमपीएससी.