|| देवेश गोंडाणे

लाखो विद्यार्थ्यांना चिंता

नागपूर : राज्यभर गोंधळ उडवणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ परीक्षेचा पेपर फुटल्याचा अहवाल पुणे सायबर पोलिसांनी राज्य सरकारकडे सादर केल्यानंतरही आरोग्य विभागाकडून अद्याप परीक्षेसंदर्भात कुठलाही निर्णय जाहीर न झाल्याने लाखो परीक्षार्थींचा जीव टांगणीला लागला आहे. तर पेपरफुटीनंतरही वर्ग ‘क’चा निकाल जाहीर करण्यात आल्याने काही विद्यार्थी अंतिम यादीच्या प्रतीक्षेत आहेत. तर परीक्षेच्या आधीच पेपर फुटल्याने परीक्षा ग्राह्य कशी धरणार, असाही सवाल उपस्थित होत असल्याने या दोन मतप्रवाहामुळे परीक्षार्थींमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती आहे.

आरोग्य विभागाच्या वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’च्या ६२०५ पदांसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेण्यात आली. न्याय कम्युनिकेशन प्रा. लि.ने घेतलेल्या या परीक्षेच्या दिवशीही राज्यभरातील विविध केंद्रांवर पेपर फुटल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यानंतर आरोग्य विभागानेही यावर आक्षेप घेत न्याय कम्युनिकेशनला नोटीस बजावत उत्तर मागितले होते. आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याचा विद्यार्थी संघटनेकडून होणारा आरोप आणि परीक्षा केंद्रांवर दिसून आलेले अनेक पुरावे आणि उणिवांनंतरही राज्य सरकारकडून याविरोधात कुठलीही कठोर कारवाई करण्यात आलेली नव्हती. मात्र, म्हाडा परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणानंतर पुणे सायबर पोलिसांकडून राज्यभर सुरू झालेल्या धडक कारवाईनंतर आरोग्य विभागासंदर्भात मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये आरोग्य विभागातील पेपर फोडणाऱ्या लातूर येथील उपसंचालक आणि आरोग्य सेवा कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांना अटक करण्यात आली आहे. यांच्यासह अन्य भागांतूनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हिवाळी अधिवेशनात पोलिसांचा अहवाल आल्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. आता पुणे पोलिसांनी वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ या दोन्ही परीक्षांचा पेपर फुटल्याचा अहवाल सरकारला दिला आहे. मात्र आरोग्य विभागाने अद्यापही परीक्षेबाबत कुठलाही निर्णय न दिल्याने सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे.   

विद्यार्थ्यांमध्ये दोन गट

पेपर फुटल्याचे सिद्ध झाल्यानंतरही आरोग्य विभागाने वर्ग ‘क’चा निकाल जाहीर केला. यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण दाखवण्यात आल्याने अनेकांना नोकरीची शाश्वती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशांकडून शासनाने त्वरित निकाल जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. तर पेपर फुटल्याचे सिद्ध झाल्याने अशी परीक्षा ग्राह्य धरता येणार नसल्याने ती रद्द करावी अशी मागणीही होत आहे.

अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असतानाही सरकारकडून अद्याप कुठलाही निर्णय  घेण्यात आलेला नाही हे  दुर्दैव.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गट-क आणि गट-ड या दोन्ही विविध संवर्गाचे पेपर फुटल्याचे पुणे पोलिसांनी जाहीर केले. तरीही आरोग्यमंत्री तथा आरोग्य विभाग सदर परीक्षा रद्द करण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करताना दिसून येत नाहीत. आजवर विद्यार्थ्यांना इतका मनस्ताप कोणत्याही सरकारच्या काळात झाला नसेल. मुख्यमंत्र्यांनी स्वत: याबाबतीत लक्ष घालून या दोन्ही परीक्षा तात्काळ रद्द करून परत घ्याव्या.  – राहुल कवठेकर, अध्यक्ष, एमपीएससी समन्वय समिती