नागपूर : दीक्षाभूमी परिसरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापिकेच्या विनयभंग प्रकरणात आरोपी रवी मेंढे आणि अरुण जोसेफ या दोघांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावला. मात्र तरीही गाफील राहिलेल्या बजाजनगर पोलिसांच्या हातावर तुरी देत दोन्ही आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.

आता सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर या दोघांनाही खंडपीठात आव्हान देण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे येते काही दिवस त्यांच्या अटकेची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात पोलिसांनी दाखवलेल्या या अक्षम्य गाफीलपणामुळे शैक्षणिक वर्तूळात संतापाचा सूर उमटत आहे.

संस्थेतील ज्येष्ठ कर्मचारी डॉ. अरुण जोसेफ (६६) आणि स्मारक समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक रवी मेंढे (६०) या दोघांविरोधात सहयोगी प्राध्यापिकेने मानसिक छळाची तक्रार दिली. मेंढे याने २३ जुलै २०२४ ला आपल्याशी गैरवर्तन केले होते, अशा आशयाची तक्रार प्राध्यापिकेने बजाजनगर पोलीस ठाण्यात केली होती. दरम्यान दोघांनीही अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यावर युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. मेंढेची बाजू अ‍ॅड. मनोज कारिया आणि जोसेफची बाजू अ‍ॅड रोहन मालवीय यांनी मांडली.

अरुणा सबाने यांचे सरन्यायाधीशांना पत्र

प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयामधील एका प्राध्यापिकेच्या मानसिक छळाच्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका अरुणा सबाने यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे मेलच्या माध्यमातून तक्रार केली आहे.

विविध माध्यमातून दबाव टाकून हे प्रकरणात दाबले जात असल्याने सबाने यांनी तक्रारूत नमूद केले आहे. महाविद्यालयात कार्यरत नसलेल्या दोन पुरुषांना समितीतले लोक का घाबरतात? दीक्षाभूमीसारख्या पवित्र प्रांगणामध्ये असलेल्या महाविद्यालयात अशाप्रकारचे कृत्य होत असेल तर यावर काय बोलायला पाहिजे? असे अनेक प्रश्न सबाने यांनी सरन्यायाधिशांचे लक्ष वेधले आहे.

या प्रकरणात दोघांनाही बजाजनगर पोलिसांनी ठाण्यात हजर राहून तपासात सहकार्य करण्यासाठी नोटीस बजावली होती. दरम्यान त्यांनी वकिलांमार्फत दाखल केलेला अटकपूर्व अर्ज न्यायालयाने फेटाळला. मात्र तरीही ते ना पोलिसांना शरण आले ना न्यायालयासमक्ष हजर झाले. त्यामुळे ते फरार झाले. पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.- अजय मानकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजाजनगर