दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

नागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या अटके नंतर पुन्हा एकदा भारतीय वनसेवेतील दक्षिण भारतीय अधिकाऱ्यांची लॉबी त्यांना वाचवण्यासाठी सक्रिय झाली आहे  तर काहींनी चक्क मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत धाव घेतली आहे.

हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवकु मार या अधिकाऱ्याला अटक के ल्यानंतर रेड्डी यांच्या अटके ची मागणी जोर धरू लागली होती. त्यावेळीही त्यांचे निलंबन थांबवण्यासाठी भारतीय वनसेवेतील दक्षिण भारतीय अधिकाऱ्यांची लॉबी समोर आली होती. त्यांचे निलंबन होऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आले, पण ते अयशस्वी ठरले. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी अनेक समित्या आल्यानंतर रेड्डी यांना अटक होऊ नये यासाठीही पुरेपूर प्रयत्न करण्यात आले. मात्र, बुधवारी रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतल्यानंतर रात्रीपासूनच पुन्हा एकदा या अधिकाऱ्यांची लॉबी त्यांना या प्रकरणातून वाचवण्यासाठी सक्रिय झाली आहे. गुरुवारी वनखात्याचे मुख्यालय असलेल्या नागपूर येथील वनभवनातून मुख्यमंत्री कार्यालयात दूरध्वनी करण्यात आले.  चंद्रपूर येथील एका अधिकाऱ्याने तिथल्याच एका मंत्र्यांशी संपर्क साधला.  नागपूर येथेही नुकतेच बदली झालेल्या अधिकाऱ्याने येथून जाता जाता शहराच्या एका मंत्र्यांशी संपर्क साधला. मुंबईतील काही अधिकाऱ्यांनी तिथल्या मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला. पश्चिम महाराष्ट्रातील एका अधिकाऱ्याने देखील असाच प्रयत्न के ला, पण त्याला मंत्र्यांकडूनच चांगले खडसावण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, हाच अधिकारी रेड्डी यांना चांगला वकील शोधून देण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे. रेड्डी यांना या प्रकरणातून वाचवण्यासाठी मंत्रालयातही दिवसभर दूरध्वनी खणखणत असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली.