लोकसत्ता टीम

चंद्रपूर : अनुकंपा तत्त्वावर असलेल्या शिपायास कायमस्वरूपी करण्यासाठी दीड लाखांची लाच घेणाऱ्या संस्था अध्यक्षासह सचिव व शिक्षिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात अटक केली. महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्था, गिरगावचे संस्थाध्यक्ष मोतीराम सखाराम मोहुर्ले (७९), संस्था सचिव मधुकर मोतीराम मोहुर्ले (५२) तर याच संस्थेंतर्गत संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका मंगला मधुकर मोहुर्ले (५०) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.

महात्मा जोतिबा फुले शिक्षणसंस्था गिरगावद्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गिरगाव येथे तक्रारकर्त्या महिलेचा पती शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागी मुलाला अनुकंपा तत्त्वावर कायमस्वरूपी करण्याकरिता १२ लाख रुपयांची मागणी त्या विधवा महिलेकडे केली. मात्र त्या विधवा महिलेला लाच देण्याची इच्छा नसल्याने तिने याबाबतची तक्रार चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३ एप्रिल रोजी केली. तडजोडीअंती दीड लाख रुपये स्वीकारण्याची तयारी तिघांनी दर्शवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-बुलढाणा : लोकसभेच्या धामधुमीत पिस्तूलसह १७ काडतूस जप्त

दरम्यान, ८ एप्रिल रोजी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंदेवाही येथे सापळा रचून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना संस्था सचिव यांना अटक केली. ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील, वैभव गाडगे, अमोल सिडाम, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम यांनी केली.