बुलढाणा : शेगाव तालुक्यातील ३८ गावांना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्यावतीने आज, मंगळवारी शेगाव वरवट मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील १४० गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शेगाव तालुक्यातील ३८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेची जलवाहिनी जोडणी झाली, मात्र या गावांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा केला जात नाही. परिणामी हजारो गावाकऱ्यांचे बेहाल होत आहे. यामुळे या गावांना तत्काळ पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज, ५ ऑगस्ट रोजी शेगाव ते वरवट मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

पाणी योजना राबविली, तहान नाही भागविली

आंदोलकांनी हाती मागण्यांचे फलक घेत घोषणा दिल्या. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘आमच्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे देवेंद्रा’, ‘पाणी योजना राबविली, तहान नाही भागविली,’ आदी घोषणांनी मार्ग दुमदुमला. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह महिलांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने शेगाव-वरवट मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली.

या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलकांनी आपल्या मागण्या अधिकाऱ्यांजवळ कथन केल्या. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील १४० गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जळगाव, संग्रामपूर आणि शेगाव या तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. याच योजनेला शेगाव तालुक्यातील आणखी ३८ गावे जोडण्यात आलेली आहेत. मात्र या गावांपर्यंत अद्याप पाणी पोहोचलेच नाही. हा भाग खारपान पट्ट्यात मोडतो. यामुळे या गावांतील नागरिकांमध्ये किडनी आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. यासाठी येथील गावकऱ्यांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या नेत्या नंदा पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात या भागातील महिला व नागरिकांनी हे रस्ता रोको आंदोलन केले.