विधान परिषदेसाठी बावनकुळेंचा अर्ज दाखल;गडकरी, फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपकडून माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारीअर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, बरिएमंच्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, महापौर दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरात जमावबंदीचे आदेश असतानाही भाजपने या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांनी गर्दी  केल्याने आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली. आठवडय़ाचा पहिलाच दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची यामुळे चांगलीच गैरसोय झाली. सकाळी १०.३० वाजतापासूनच शहर व जिल्ह्यतील सर्व भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आकाशवाणी चौकात एकत्र येत होते. पक्षाचे झेंडे हाती घेऊन व घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी वातावरण निर्मिती केली होती. मात्र येथे पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या छोटू भोयर यांचीच सर्वाधिक चर्चा होती.

यावेळी  निवडणूक प्रमुख आ. प्रवीण दटके आणि सहनिवडणूक प्रमुख डॉ. राजीव पोतदार यांच्यासह पक्षाचे सर्व विद्यमान व माजी आमदार तसेच आजी व माजी खासदार महापालिका, जिल्हा परिषद व नगर पंचायतीचे पक्षाचे सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, छोटू भोयर यांचा राजीनामा पक्षाला प्राप्त झाला आहे. त्यांच्यासह इतरांनीही उमेदवारी मागितली होती. पण कोणा एकालाच उमेदवारी देणे शक्य आहे. त्यामुळे इतरांची नाराजी  स्वाभाविक आहे, असे भाजपचे शहर अध्यक्ष व आमदार प्रवीण दटके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. फडणवीस व गडकरी यांनी मात्र छोटू भोयर यांच्याविषयीच्या प्रश्नांवर बोलण्यास नकार दिला.

पक्षाचा विश्वास सार्थ ठरविणार

पक्षाने उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास दर्शवला तो निवडणुकीत विजयी झाल्यावर या भागाचे प्रश्न विधान परिषदेत मांडून सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला जाईल. पक्षाची मते फुटत नाहीत. त्यामुळे विजय निश्चित आहे.

– चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार, भाजप.

बावनकुळेंना कामाची पावती मिळाली. बावनकुळे यांनी मंत्री म्हणून तसेच संघटनेत  केलेल्या कामाची पावती म्हणूनच त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांचा विजय निश्चित आहे.

– देवेंद्र फडणवीस, भाजप नेते व विरोधी पक्षनेते.

तावडेंची नियुक्ती भाजपसाठी अभिमानाची – फडणवीस

भाजप नेते व माजी मंत्री विनोद तावडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी करण्यात आलेली नियुक्ती राज्यात भाजपसाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. दिवंगत नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर प्रथमच महाराष्ट्रातील भाजप नेत्याला पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा मान मिळाला, त्यांना शुभेच्छा, असेही फडणवीस म्हणाले.