यवतमाळ: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यात गेली दोन वर्ष सर्व शासकीय, अशासकीय समित्या सदस्यांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र सरकारध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क पालकमंत्र्यांना डावलून जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांची नियुक्ती केली. ही निवड करताना शिवसेना आणि भाजपला विश्वासात न घेतल्याने सत्ताधारी पक्षांत समन्वय नसल्याची बाब पुढे आली आहे.

जिल्ह्याच्या विकासाबाबत घेतल्या जाणाऱ्या निर्णयात जिल्हा नियोजन समितीचे महत्वाचे योगदान असते. शिवाय सत्ताधारी पक्षातील राजकीय पदाधिकाऱ्यांची सन्मानजनक सोय करण्याची हक्काची जागा नियोजन समिती आहे. या समितीवर जाण्यासाठी अनेकांची धडपड असते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या शिवसेना (शिंदे गट) व भाजपने मात्र अद्यापही अनेक शासकीय, अशासकीय समित्यांचे गठण केले नाही.

हेही वाचा… हातातून कबुतर निसटल्याचे कारण झाले अन् रागाच्या भरात गळा आवळला…

जिल्हा नियोजन समितीवर प्रारंभी शिवसेना (शिंदे गट) व भाजपच्या प्रत्येकी सहा कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचे ठरले होते. मात्र कोणाला संधी द्यावी, याबाबत दोन्ही पक्षांत अद्यापही एकमत झाले नाही. दरम्यानच्या काळात राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार सहभागी झाले. त्यामुळे नियोजन समितीत प्रत्येक पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी चार जागा आल्या. परंतु, शिवसेना, भाजपने समितीवर कोणाला पाठवायचे हे ठरवलेच नाही. तर, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री म्हणून अजित पवारांनी सुत्रे स्वीकारली आणि त्याचा फायदा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी करून घेतला.

जिल्हा नियोजन समितीवरील जागा रिक्त असल्याने या भरण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांना भेटून केली. अजित पवार यांनी या मागणीची तातडीची दखल घेत जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहटे (पुसद), क्रांती राऊत (यवतमाळ), प्रा. सीताराम ठाकरे आणि अब्दुल वहाब अ. हलीम यांची विशेष निमंत्रित म्हणून शासनाकडून निवड केली. या नियुक्तीचा आदेशच वित्त विभागाने काढला आहे. या नियुक्तीनंर जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. भापजचे जिल्ह्यातील पाचही आमदार या निर्णयानंतर अवाक झाले आहे. नियोजन समितीसाठी शिवसेना, भाजपातील अनेकजण बाशिंग बांधून असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजप, शिवसेनेला जोरदार झटका दिल्याची चर्चा राजकारणात आहे.

हेही वाचा… धक्कादायक! नवा कोरा पूल रात्रीतून वाकला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्री संजय राठोड जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्पर घेतला. नियोजन समितीत सत्ताधारी तिन्ही पक्षांना प्रत्येकी चार जागांचा फॉर्म्युला ठरला होता. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी नावांवर शिक्कामोर्तब करणे आवश्यक असताना, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या नियुक्तीचा थेट आदेशच काढला. आपल्याला याबाबत काहीही कल्पना नव्हती, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले. आता शिवसेना (शिंदे गट) व भाजपच्या प्रत्येकी चार सदस्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राठोड यांनी दिली.