बुलढाणा : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. कोणता नेता, पदाधिकारी कधी काय करेल याचा अंदाज करता येत नाही. यातच निवडणुकीच्या काळात तर राजकारणात काय होईल हे ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकणार नाही असा काळ आला आहे.बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगर पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत याचा आश्चर्यकारक नव्हे धक्कादायक प्रत्यय आलाय! यामुळे बालाजी नगरी म्हणून परिचित देऊळगाव राजा नगरीतील सामान्य मतदारच काय भले भले राजकीय जाणकार एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी देखील चक्रावून गेले आहे.

देऊळगाव राजा पालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीचे मजेदार विभाजन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार मनोज कायंदे यांनी भाजपसोबत युती केली आहे. मोठ्या पवार साहेबांचे विदर्भातील शिलेदार, माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी कट्टर विरोधक शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या सोबत आघाडी केली. नगर विकास आघाडीच्या नावाने हे दोघे नेते एकत्र लढणार आहे. देऊळगाव राजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे शिंगणे व खेडेकर
यांनी सांगितले. आम्ही एकमेकांचे विरोधक असलो तरी केवळ शहर विकास याच मुद्यावर आम्ही एकत्र आलो असल्याचे या माजी आमदारानी स्पष्ट केले.

या धक्कादायक राजकीय हालचाली मुळे काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसला. यापरिणामी आता ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र लढत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी ‘लोकसत्ता’ सोबत आज सोमवारी बोलतांना याची पुष्टी केली. आम्ही देऊळगाव राजात स्वतंत्र पॅनेल उभे करणार असून काँग्रेस सोबत राहील असे ते म्हणाले. आघाडीचे सर्वोच्च नेते असलेल्या राजेंद्र शिंगणेच्या शिंदे गटासोबत आघाडी करण्याच्या निर्णयावर काही बोलण्याचे त्यांनी टाळले.

तीन आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला?

दरम्यान देऊळगाव राजा मध्ये आता मजेदार आघाडी झाल्याने चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. निवडणूक उमेदवारात होत असली तरी खरी लढत सिंदखेड राजाचे माजी आमदार राजेंद्र शिंगणे, शशिकांत खेडेकर, विद्यमान आमदार मनोज कायंदे ( अजितदादा गट ) यांच्यात आहे. या तिघांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.