लोकसत्ता टीम नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने महाराजबाग समोरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा १८ जून रोजी सकाळी १० वाजता आयोजिला आहे. भूमिपूजनानंतर मुख्य कार्यक्रम देशपांडे सभागृहात होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी पर्यावरणमंत्री आणि ठाकरे सेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे हे सर्वजण एकाच मंचावर दिसणार आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनाही या कार्यक्रमाला निमंत्रण आहे. पण अद्याप त्यांच्याकडून होकार आलेला नाही. आगामी काळातील निवडणूकांमुळे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यभर फडणवीस सरकारच्या वतीने सध्या विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. रायगडावर नुकताच राज्याभिषेकाचा मुख्य सोहळा पार पडला. आणखी वाचा-कोल्हापूरची दंगल सरकार पुरस्कृत! आमदार विजय वडेट्टीवार यांचा आरोप दुसरीकडे विरोधकांच्यावतीने राज्यभिषेकाला साडेतीनशे वर्षे पुढील वर्षी होणार असताना केवळ निवडणूक डोळ्यापुढे ठेवत हे सारे कार्यक्रम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यानंतरही अजित पवार आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला हजर राहणार असल्याने राजकीय जुगलबंदी रंगणार हे निश्चित आहे.