लोकसत्‍ता टीम

अमरावती : या देशावर ज्‍यांनी आक्रमण केले, ते संपले. पण हिंदू धर्म कधी संपला नाही. कुणाच्‍या बापाची हिंमत आहे, जो हिंदू धर्म नष्‍ट करू शकेल. द्रमूकचे नेते उदयनिधी स्‍टॅलिन जर हिंदू धर्म संपविण्‍याची भाषा बोलत असतील, तर त्‍यांना त्‍यांची जागा दाखवावी लागेल. हिंदू धर्माला डेंग्यू, मलेरिया म्‍हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनचे वडील एम. के. स्‍टॅलिन यांच्‍या बाजूला माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे बसतात. ते आता कुणाच्‍या सोबत आहेत, हे लोकांना कळले आहे. त्‍यांना आता नक्‍कीच घरी पाठवावे लागेल, अशी टीका उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या वतीने येथील नवाथे चौक परिसरात आयोजित दहीहंडीच्‍या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्‍यावर जोरदार टीका केली. फडणवीस म्‍हणाले, राणा दाम्‍पत्‍याने हनुमान चालिसाचे पठण केले, म्‍हणून त्‍यांना महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात १२ दिवस तुरूंगात रहावे लागले. आपल्‍या महाराष्‍ट्रात हनुमान चालिसा म्‍हणण्‍याची परवानगी नव्‍हती. येथे हनुमान चालिसाचे पठण करायचे नाही, तर पाकिस्‍तानात करायचे का, असा सवाल करून फडणवीस म्‍हणाले, की नरेंद्र मोदी यांच्‍या कार्यकाळात तो दिवसही दूर नाही. आपण पाकिस्‍तानातही हनुमान चालिसाचे पठण करू शकू.

आणखी वाचा-मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, नागपुरात आंदोलन सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भगवान श्रीकृष्‍ण हे तर अमरावती जिल्‍ह्याचे जावई आहेत. त्‍यांच्‍या जन्‍मोत्‍सवात आम्‍ही विकासाचा, प्रेमाचा काला घेऊन आलो आहोत. गेल्‍या सत्‍तर वर्षांत जितका निधी अमरावती जिल्‍ह्याला मिळाला नाही, तेवढा निधी आमच्‍या सत्‍ताकाळात मिळाला, असा दावा फडणवीस यांनी केला. अमरावतीतील प्रस्‍तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ विकास, मेगा टेक्‍सटाईल पार्क, हनुमान व्‍यायाम प्रसारक मंडळात क्रीडा विद्यापीठ, रिद्धपुरात मराठी भाषा विद्यापीठ, रस्‍त्‍यांची २ हजार कोटी रुपयांची कामे हा विकासाचा ओघ असल्‍याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी चित्रपट अभिनेत्री शिल्‍पा शेट्टी, अभिनेते राजपाल यादव, खासदार नवनीत राणा, डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा आदी उपस्थित होते.