नागपूर : आज देशात आणि राज्यात आपल्या विचारांचे अनुकूल सरकार आहे. परंतु, सरकार आले म्हणजे आपले काम संपले असे नाही. याउलट आपल्यासमोर मोठी आव्हाने उभी आहेत. ज्यावेळी आपला विचार प्रस्थापित होतो त्यावेळी आपल्या विचारांच्या विरोधी शक्ती सैरभैर होतात. या शक्ती देशाला आणि समाजाला अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न करतात. आज विद्यापीठे अराजकतेचे बिजारोपण करण्याची जागा झाली आहे, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

नागपूरच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५३ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात मोठ्या प्रमाणात अराजकता कशी पसरवता येईल, देशाच्या संस्थांवरील तरुणाईचा विश्वास कसा कमी होईल, असा प्रयत्न विरोधी शक्तींकडून सुरू आहे. तरुणाईला भ्रमित करून त्यांच्यात नैराश्य पसरवण्याचे काम या शक्ती करीत आहेत. या देशात तुम्हाला न्याय मिळू शकत नाही असा प्रचार करून देशातील संस्थांप्रती अविश्वास पसरवण्याचे काम सुरू आहे. यातील वाईट बाब ही की हे सर्व विद्यापीठांच्या शैक्षणिक परिसरात घडत आहे. तरुणांचे मन बंडखोर असते. ही बंडखोरी विधायक दिशेने जाईल की विघातक हे महत्त्वाचे आहे. ‘युवा’ या शब्दाचा उलट ‘वायू’ होतो. हा वायू चांगला असेल तर समाजाला प्राणवायू म्हणून जीवदान देतो. पण, हाच वायू प्रदूषित झाला तर समाजाला उद्ध्वस्त करतो. त्यामुळे अशा वायुरूपी युवकांना कशाप्रकारे प्रदूषित करता येईल असा प्रयत्न देशात सुरू आहे. त्यामुळे अराजकता पसरवणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रवादी ताकदींनी उभे राहून संविधानाचे रक्षण व लोकशाहीच्या मजबुतीसाठी काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

नक्षलवादी विचार शहरात

आज नक्षलवादी विचार संपुष्टात येऊन बंदुका हातात घेणारे मुख्य प्रवाहात येत आहेत. परंतु, हा विचार शहर आणि महाविद्यालयांमध्ये कसा नेता येईल, संविधान आणि संस्थांच्या विरोधात बंड कसे करता येईल, असा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. बाबासाहेबांनी दिलेले संविधान ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे संविधानाने तयार केलेल्या संस्था अधिक बळकट कशा होतील, त्यावर लोकांचा विश्वास कसा वाढेल यासाठी आपल्याला काम करावे लागेल, असेही फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थी संघाच्या निवडणुकांबाबत विचार

महाविद्यालय आणि विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहे. त्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्व तयार करण्याचे केंद्र आहेत. आम्हीही यातून पुढे आलो. त्यामुळे राज्य सरकार विद्यार्थी संघाच्या निवडणुकांवर गांभीर्याने विचार करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.