नागपूर: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आमच्या वेदना समजून घेणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस मुंबईत कोणत्याच आंदोलकांना आझाद मैदानावर जाण्यापासून थांबवणार नाहीत आणि गरीबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे. पण आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी ही मराठ्यांची चेष्टा आहे, अशी टीका जरांगे यांनी केली.
आंदोलनाच्य दिवसापासून जरांगे पाटील फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. त्यावर भाजप नेते आणि मसहूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांची पाठराखण करत जरांगेंचा समाचार घेतला आहे. बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात आजपर्यंत मराठा समाजाचे अनेक नेते झाले.
अनेक मुख्यमंत्रीही झाले. मात्र, मराठा समाजाला कुणीही आरक्षण देऊ शकले नाही. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देण्याचे काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही आरक्षण दिले. आजही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फडणवीस सरकार सकारात्मकच आहे. मात्र, फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील हे वारंवार टीका करत आहेत. केवळ देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांच्यावर ही टीका होत आहे का?, ते मराठा असते तर तुम्ही कशी टीका केली असती का?, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
बावनकुळे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रामध्ये गणपतीसारखा मोठा उत्सव सुरू आहे. प्रत्येकाच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. असे असताना या काळात जरांगेंनी मोर्चा काढणे हे बरोबर नाही. सरकारकडे विविध मागण्या करणे, त्यासाठी मोर्चा काढण्याला कोणाचाही विरोध नाही. मात्र मोर्च्याची वेळ बदलता आली असती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप सरकारने अनेकदा प्रयत्न केले आहेत. त्यांच्या आरक्षणासाठी आमचे पूर्ण समर्थन आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर समाजाचे आरक्षणाला कुठेही धक्का लागायला नको ही भाजपची भूमिका आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना २०१४ ते २०१९ या काळातही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले. आजही सरकारची भूमिका मराठा समाजाचे आरक्षण देण्याच्या बाजूनेच आहे. मात्र हे आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाचे आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे बावनकुळे म्हणाले.