नागपूर : विधानसभेत भाषण देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रेत नक्षलवादी संघटनांचा समावेश आहे, असा आरोप केला होता. यावर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला. समाजात शांती आणि सद्भाव वाढावा यासाठी समविचारी पक्षाच्या वतीने २९ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात तुषार गांधी यांनी प्रेस क्लबमधील पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी गांधी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधीवादी संघटना शहरी नक्षलवादी असल्याचा ठपका ठेवला होता.

परंतु, गांधीवादी हे क्रांतीकारी आहेत. हेच क्रांतीकारी सत्तेत असणाऱ्यांची झोप उडवतात. त्यामुळे फडणवीसांना आमचा राग येणे स्वाभाविक आहे. तसेच ते स्वत: ज्या विचारधारेतून येतात त्यांना गांधी विचारांची कायम भीती असते. त्यामुळे त्यांच्या आरोपांचा नवल नाही. आम्ही क्रांतीकारी आहोत पण बंधुकधारी नाही, अशा शब्दात महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. यावेळी संविधान सत्याग्रह यात्रा समितीचे मुख्य समन्वयक संदेश सिंगलकर उपस्थित होते.

तुषार गांधी म्हणाले, २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि विजयादशमी एकाच दिवशी येत आहे. या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा जल्लोषात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला महात्मा गांधी यांचा विचार अधिक बुलंद करण्याची गरज आहे. संविधानाचे रक्षण करणारे लोक या देशात आहेत हे दाखवण्यासाठी इंडिया आघाडी मधील घटक पक्ष आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समविचारी संघटनांना सोबत घेऊन द्वेषाच्या राजकारणाविरोधात ही यात्रा राहणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांधीवादी संघटनांना शहरी नक्षलवादी ठरवले. त्यासाठी जनसुरक्षा कायदाही आणला. मात्र, आम्ही नक्षवादी नसून क्रांतीकारक आहोत. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी हातात बंदूक न घेता आम्ही आमचा लढा लढणार असल्याचा निर्धार गांधी यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीसांनी काय आरोप केला होता?

मी भारत जोडो अभियानावर बोललो होतो, तेव्हा माझ्यावर टीका केली गेली. आज पुराव्यासह सांगतो. राहुल गांधींनी सुरू केलेल्या या अभियानात कोण आहे ते एकदा पहा, फडणवीस म्हणाले. देशात आपण नक्षलवादाविरोधात लढाई पुकारतो. नक्षलवादी काय करतात? त्यांचा भारताच्या संविधानावर, त्यातून तयार झालेल्या कोणत्याही संस्थेवर आणि लोकशाहीवर विश्वास नाही. ते समांतर राजसत्ता निर्माण करण्याची इच्छा असणारा गट आहे, असं ते नक्षलवाद्यांविषयी बोलताना म्हणाले. फडणवीस पुढे म्हणाले, ज्यावेळी देशात नक्षलवादाविरोधात मोठी लढाई सुरू झाली तेव्हा मोठ्या प्रमाणात नक्षलवादी संपायला लागले. त्यावेळी हा नक्षलवाद शहरांमध्ये सुरू झाला. १६-२८ वयापर्यंत प्रत्येकाच्या मनात क्रांतीची भावना असते, असे नमूद करत फडणवीस म्हणाले की, या वर्गाला पकडून त्यांच्यात अराजकतेचं रोपण करण्यासाठी तयार झालेल्या गुप्त गुन्हेगारी गटांना शहरी नक्षलवाद म्हटलग जाऊ लागले. हे संविधानाचं नाव घेतात, पण संविधानानं तयार केलेल्या सर्व शासकीय संस्थांबद्दल लोकांमध्ये संशय तयार करतात आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला पाहिजे असं काम करतात, असा आरोप फडणवीसांनी केला.