नागपूर : CM Devendra Fadanvis and Rohit Pawar मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकलेल्या हजारो मराठा आंदोलकांच्या काही मागण्या मान्य करून आणि काही मागण्यांवर तोडगा काढून त्यांना परत पाठवल्यानंतर भाजपाकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.

यानंतर शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ही जाहिरात पहिल्या पानावर सर्वच दैनिकात छापून आली. त्यात खाली ‘देवाभाऊ’ इतकाच उल्लेख आहे. यावरून आता राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. रोहित पवार आणि संजय राऊत यांनी जाहिरातीवरून टीका केल्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर दिले. यामुळे या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

संजय राऊतांनी दिलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एका दिवसात ४० ते ५० कोटी रुपयांचा जाहिरातीवर खर्च झाल्याचा आरोप केला. राऊतांच्या मते, या जाहिरातींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर करण्यात आला आहे. त्यांनी या खर्चाच्या स्रोतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तो काळा पैसा असण्याची शक्यता वर्तवली. राऊतांनी या जाहिरातींचा उद्देश आणि हेतू स्पष्ट नसल्याचेही म्हटले आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

संजय राऊत यांच्या पोटात का दुखते?

कुणीही जाहिरात छापली असेल तरी रोहित पवारांना काय समस्या आहे. जाहिराती छापून येणे किंवा जाहिराती येणे यात गैर काय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या बद्दल एखादे जाहिरात छापून आली तर विरोधकांना दु:ख का? असेही बावनकुळे म्हणाले. संजय राऊत यांच्या टीकेवर बावनकुळे म्हणाले की, कर्तव्यनिष्टेसाठी जर कुणी मुख्यमंत्र्यांच्या नावाने जाहिरात दिली तर राऊत यांच्या पोटात का दुखत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा विनाकामाची जाहिराती येत होत्या. ते मुख्यमंत्री असतांना किती पैसा खर्च केला. कितीतरी खासगी पैसा खर्च झाला. याचा हिशोब तेकाढतील का?. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कर्तव्यावर त्यांच्या कामावर खाजगी व्यक्ती असो की सरकार असो जाहिरात देत असेल तर ह्यांचा पोटात का दुखत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

रोहित पवार जाहिरातीवर काय म्हणाले?

एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता. या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले. विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे, असा आरोप केला.