उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर “मला जाणूनबुजून काही लोकांचा उल्लेख करायचा आहे”, असं म्हटलं. तसेच चारजणांचा खास उल्लेख केला आणि त्यांच्या कामामुळे हा महामार्ग होऊ शकला, असं नमूद केलं. ते रविवारी (११ डिसेंबर) नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला जाणूनबुजून पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर काही लोकांचा उल्लेख करायचा आहे. समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी आमचे राधेश्याम मोपलवार, मनोज सौनिक, प्रविण परदेशी, गायकवाड यांचं मोलाचा वाटा होता. ज्यांच्या नावाचा उल्लेख मी करू शकलो नाही त्याची मी माफी मागतो. मात्र, या टीमने जे काम केलं ते खूप जबरदस्त आहे. त्यांच्या कामामुळेच हा महामार्ग होऊ शकला.”

“पुढील टप्प्यात नागपूर-गोवा महामार्ग करणार”

“पुढील टप्प्यात नागपूरहून गोव्यापर्यंत अशाच प्रकारचा महामार्ग तयार करण्यात येईल. हा महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला एकत्रित करेल. त्याचाही आराखडा आम्ही तयार केला आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

हेही वाचा : “एका व्यक्तीचा पहिल्या दिवसापासून माझ्यावर विश्वास होता, त्याचं नाव…”, मोदींसमोर फडणवीसांचं वक्तव्य

“मला मोदींचे विशेष आभार मानायचे आहेत, कारण…”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “मला मोदींचे विशेष आभार मानायचे आहेत, कारण आपला कामाचा वेग लोकांना लक्षात आला पाहिजे. आज मेट्रो फेज टू आणि नाग नदीच्या संवर्धन असे दोन प्रकल्प होत आहेत. आमच्या मागच्या सरकारमध्ये आम्ही या दोन्ही प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले होते. मोदींनी ते प्रस्ताव फास्टट्रॅकवर ठेवले.”

व्हिडीओ पाहा :

“पंतप्रधान कार्यालयाने केवळ ३५ दिवसात दोन्ही प्रकल्पांना कॅबिनेट मान्यता दिली”

“या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी आल्या. मध्यंतरी सरकार बदललं आणि अडीच वर्षात या त्रुटींवर मागील सरकारने उत्तरही दिलं नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्रुटींची पुर्तता केली आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयात गेलो. मी पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली आणि त्यांनी केवळ ३५ दिवसात या दोन्ही प्रकल्पांची प्रक्रिया पूर्ण करून कॅबिनेटची मान्यता दिली. आज त्याचं भूमिपूजन होत आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा : अरे कुणाच्या बापाच्या…”, फडणवीसांच्या “तीन वर्षे स्थगितीतच वाया गेले” टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर

“डबल इंजिन सरकार झालं नसतं तर…”

“हे मोदी सरकार आहे, ही मोदी सरकारची गती आहे आणि हे डबल इंजिन सरकार आहे. डबल इंजिन सरकार झालं नसतं तर पुढील काही वर्षे या त्रुटी तशाच राहिल्या असत्या आणि हे कार्यक्रमही झाले नसते,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis mention four names before pm narendra modi in nagpur samruddhi mahamarg pbs
First published on: 11-12-2022 at 14:29 IST