नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना राज्य सरकारने ज्या पद्धतीने वागणूक दिली ती अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारांनादेखील अशी वागणूक दिली जात नाही. राणा दाम्पत्याबाबत राज्य सरकारने कौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
फडणवीस नागपुरात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फडणवीस यांनी शनिवारी रात्री रुग्णालयात जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली. राणा यांची प्रकृती आता स्थिर होत आहे. मात्र त्यांना गेल्या १४ दिवसांत राज्य सरकारने पोलिसांच्या माध्यमातून जी वागणूक दिली, ती गंभीर आहे. एका गुन्हेगारालाही अशी वागणूक दिली जात नाही, असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, येत्या १४ तारखेला सर्वाचे ‘मास्क’ काढणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. याबाबत विचारले असता, मुख्यमंत्री ‘मास्क’ काढणार असतील तर ते चांगलेच आहे, अशी कोटी फडणवीसांनी केली.