विधान परिषदेच्‍या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांचा ३ हजार ३६८ मतांनी पराभव केला. या विजयानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

धीरज लिंगाडे म्हणाले, “महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे आणि अतिशय आनंद होतो आहे, की ही लढाई आम्ही जिंकलो आहोत. आव्हान जरी तगडं होतं तरी आम्हीही काही कमी नव्हतो. संपूर्ण महाविकास आघाडी आणि आम्ही अतिशय ताकदीने लढलो आहोत. मतदारांनी आम्हाला कौल दिला आहे. याप्रसंगी सगळ्या मतदारांचे मी आभार व्यक्त करतो. यापुढे आता विजयी घौडदोडीस सुरुवात झाली आहे.”

हेही वाचा – अमरावती पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी, भाजपाला धक्‍का

याचबरोबर, “मी मातोश्रीवर आणि शरद पवारांकडेही जाणार आहे. सगळ्यांची भेट घेणार आहे, कारण माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे मी सगळीकडे जाईन आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेईन. आम्ही मतदारांना जे काही आश्वासनं दिली आहेत, त्या कामाला आम्ही सुरुवात करू.” असंही लिंगाडे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, “मतदारांनी जो विश्वास आमच्यावर टाकला, महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्या संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्या सर्व संघटना त्याचप्रमाणे जुनी पेंशन संघटना या सगळ्यांमुळे हा विजय झाला आहे. शेवटी विजय हा नेहमी मतदारांचाच होत असतो, त्यापुढे संपत्ती वैगेरे कुठे कामी येत नसते. ज्या ठिकाणी मतदारांची बाजू घेण्याची वेळ येईल, आम्ही मागे हटणार नाही.” असंही धीरज लिंगाडे यांनी यावेळी सांगितलं.