नागपूर : ‘नॅशनल सायबर क्राइम पोर्टल’च्या सूचनेवरून बँकांनी पूर्वसूचना न देता बँक खाते गोठवल्याने पेट्रोल पंप मालकांनी १० मेपासून ‘डिजिटल पेमेंट’ बंद करण्याचा इशारा दिला असून त्यात सामान्य ग्राहक भरडला जाण्याची शक्यता आहे.

सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल पेमेंट’कडे मोर्चा वळवल्याने केंद्रीय गृह खात्याने संशयित बँक खात्यातून ज्या बँक खात्यात रक्कम वळती झाली, ते खाते गोठवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार नॅशनल सायबर क्राईम पोर्टलद्वारे बँकांना सूचना देण्यात येत आहे. त्याचा फटका पेट्रोल पंप चालकांना बसत आहे. अनेक पेट्रोल पंप चालकांचे बँक खाते गोठवण्यात आले आहे, त्यात त्यांचे लाखो रुपये अकडले आहेत. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी यापुढे डिजीटल पेमेंट घेण्यास नकार दिला आहे. याची झळ ग्राहकांना बसणार आहे.

बँकांनी आता एटीएममधून रोख रक्कम काढण्यावर शुल्क आकारणे सुरू केले आहे. त्यामुळे वारंवार रोख काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंप चालकांचा डिजिटल पेमेंट व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला असून फोन पे, पेटीएम, गुगल पे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांद्वारे व्यवहार करण्यास मनाई केली जाणार आहे. हा निर्णय सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘डिजिटल पेमेंट’ घेतल्याने अनेक पेट्रोल पंप मालकांचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. ज्यांनी पेट्रोलसाठी ‘पेमेंट’ केले, त्यांनी आर्थिक गैरव्यहार केला असेल तर त्यांचे खाते गोठवायला हवे. पण तसे न करता पेट्रोल पंप चालकांचे बँक खाते गोठवण्यात येत आहेत. या विरोधात १० मेपासून सर्व पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंटद्वारे पेट्रोल व डिझेलची विक्री बंद करण्यात येणार आहे. – अमित गुप्ता, अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन.