तुटलेले ओटे… त्यावर साचलेले पाणी…बसण्याच्या जागेवर कचऱ्याचे साम्राज्य… परिसरात वाढलेली झुडपे… विद्युत दाहिनीच्या मार्गावर कचरा… पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची वानवा… परिसरात अस्वच्छता… पावसाळ्यात गोवऱ्या आणि ओली लाकडे… तुटलेला विसावा ओटा आणि घाटावरील कर्मचाऱ्यांची मनमानी असे शहरातील स्मशानघाटावरचे चित्र आहे.

दहनघाटांवरील सौंदर्यीकरण आणि सुविधांवर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र त्यानंतरही घाटावरील समस्या कायम आहेत. जुलैपासून सुरू असलेल्या पावसामळे दहनघाटांची अवस्था दयनीय झाली आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना याचा फटका बसतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घाटावर आलेल्या लोकानाच स्वच्छता करावी लागते –

पूर्व नागपुरातील पारडीच्या स्मशानघाटावरील ओट्यावर पावसाचे पाणी येते. त्यामुळे अनेकदा तेथील राख पाण्यात वाहून जाते. अशीच अवस्था बेसा, मानेवाडा, मानकापूर, वाठोडा या घाटांचीही आहे. वाठोडा घाटावर पाऊस आला की दहन ओट्यावरच पाणी साचते, यामुळे तेथे सरण रचणे कठीण होते. पावसाळ्यात लाकडे व गोवऱ्या उघड्यावर पडलेली आहेत. ओले लाकूड पेट घेत नाही. घाटावर सरण रचण्यासाठी प्रत्येक ठिकाणी १२ ते १४ ओटे आहेत, मात्र त्यातील अनेक ओट्यांची दुरवस्था झाली आहे. तेथे नीट लाकडेही ठेवता येत नाहीत. अनेक वर्षांपासून ओट्यांचे सिमेंटीकरण करण्यात आलेले नाही. तेथे मोठे खड्डे पडले आहेत. स्वच्छतेच्या बाबतीतही बोंब आहे. घाटावर आलेल्या लोकानाच स्वच्छता करावी लागते. टिनाचे शेड तुटलेले आहेत. पावसाळ्यात सरणावर पाणी पडते, अशी स्थिती आहे.