गडचिरोली : एकेकाळी नक्षल्यांचे प्राबल्य असेलल्या भागात आज पोलीस जवान पोहोचले आहे. अतिदुर्गम गर्देवाडा आणि वांगेतुरीत एका दिवसात पोलीस मदत केंद्र उभारून गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांच्या बिमोडासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून येणाऱ्या काळात नागरिकांच्या सहकार्यानेच आम्ही नक्षलवाद संपवू, असा इशारा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गर्देवाडा येथे पोलीस जनजागरण मेळाव्यात बोलताना दिला.

नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसराला लागून असलेल्या गर्देवाडा आणि वांगेतुरी पोलीस मदत केंद्राला १७ फेब्रुवारीरोजी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी भेट दिली. यावेळी आयोजित जनजागरण मेळाव्यात बोलताना त्या म्हणाल्या की, या भागात शिक्षणाचा टक्का वाढणे गरजेचे आहे. देशाच्या राष्ट्रपती देखील आदिवासी समाजातून येतात. उच्च शिक्षणाच्या बळावरच त्या या पदापर्यंत पोहोचल्या. आजपर्यंत नक्षल्यांच्या कारवायांमुळे हा परिसरात मुख्य प्रवाहापासून लांब होता. परंतु आता जवानांनी येथे मदत केंद्र उभारून नागरिकांना भयमुक्त केले आहे. यामाध्यमातून शासन त्यांच्यापर्यंत पोहोचू लागले आहे. ‘दादालोरा खिडकी’ सारख्या उपक्रमातून दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत आहेत. त्यामुळे येत्या काळात नागरिकांची मने जिंकून त्यांच्याच सहकार्यानेच आम्ही नक्षलवाद संपवू असेही स्पष्ट केले. यावेळी उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला.

हेही वाचा >>>‘धर्मसंसद व हिंदू धर्मगुरूद्वारे अंधश्रद्धा वाढवण्याचे काम’, प्रा.मानव म्हणतात, मृतदेहांच्या सोपानावर भाजप…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांना विविध साहित्य व विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले. अतिशय संवेदनशील गर्देवाडा पोलीस मदत केंद्राची पाहणी करून पोलीस जवानांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, त्यांनी वांगेतुरी, सुरजागड पोलीस मदत केंद्रांनादेखील भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासह राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षल विरोधी अभियान संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश रांजनकर, पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.