नागपूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांवर मोफत उपचार केले जातात, असा दावा राज्य शासन सातत्याने करीत असते. संपूर्ण राज्य आता या योजनेचे लाभार्थी असल्याचा ढोलही बडवला जातो. परंतु, केंद्राच्या अखत्यारितील ‘एम्स’ रुग्णालयात या योजनेचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. नागपूर ‘एम्स’ने या योजनेअंतर्गत मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या डायलेसिसची संख्या परस्पर घटवल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

नागपूर ‘एम्स’मधील तीन रुग्णांचे डायलेसिस थांबल्यावर याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत यापूर्वी ९९६ व्याधींवरील उपचारांचा समावेश होता. नंतर त्यात २१३ नव्या व्याधींवरील उपचारांची भर पडल्याने आता एकूण १ हजार २०९ व्याधींवर उपचार होतो. या योजनेत समाविष्ट रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार केले जातात. यात मूत्रपिंड प्रत्यारोपण, डायलेसिसचाही समावेश आहे. दरम्यान, डायलेसिस सुरू असलेल्या रुग्णांवर ४२ दिवसांत १८ डायलेसिस व्हावे याकरिता या योजनेद्वारे १९ हजार ८०० रुपयांचे पॅकेज मंजूर केले जाते. त्यानुसार नागपुरातील राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयासह लता मंगेशकर रुग्णालय आणि इतर काही खासगी रुग्णालयांत डायलेसिस होतात. परंतु केंद्राच्या अखत्यारित असलेल्या एम्सने या पॅकेजमध्ये इतके डायलेसिस देणे शक्य नसल्याचे सांगत परस्पर डायलेसिस कमी केले. आधी ही संख्या १२ वरून आठवर आणि नंतर चक्क सहापर्यंत खाली आणण्यात आली. त्यामुळे जास्त डायलेसिसची गरज असलेल्या रुग्णांवरील उपचार अचानक थांबले. काही रुग्णांनी याबाबत महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील अधिकाऱ्यांकडे मदत तक्रारी केल्या. एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर अशा तक्रारी आल्याचे मान्य केले. त्यामुळे एम्सला खुलासा मागण्यात आला व सोबतच परस्पर डायलेसिस थांबवता येत नसल्याचेही बजावण्यात आले. थांबवलेले डायलेसिस तत्काळ सुरू न केल्यास कारवाईचाही इशारा देण्यात आला. या पत्रानंतर तरी एम्स डायलेसिसची संख्या पूर्ववत करेल की नाही, याकडे गरीब रुग्णांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – नागपूर : खासदर औद्योगिक महोत्सवातील स्वच्छतागृहात महिलांचे आक्षेपार्ह चलचित्र, कला शिक्षकाने…

हेही वाचा – मद्य शौकिनांच्या खिशावर भार वाढणार, काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योग्य कार्यवाही करण्यात येईल

नागपूर एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. अनुमंत राव यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांशी संपर्क करण्यास सांगितले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या प्रकरणाची माहिती घेत आहोत. योग्य ती कार्यवाही केली जाईल.