अकोला : गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाच्यावतीने गुरुवारी दुपारी आमदारांच्या निवासस्थानासमोर धडक देत आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान वंचित आघाडी व शिवसेना ठाकरे गटामध्ये वाद निर्माण झाला होता. आमदार नितीन देशमुख यांनी मराठा आंदोलनात राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित केल्यावर त्यांच्यात व वंचित बुजहन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्यात बाचाबाची झाली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसह उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गजरवंत सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आमदारांच्या निवासस्थानापुढे आंदोलनाची हाक दिली होती. शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या घरी आंदोलक पोहोचले. नितीन देशमुख यांनी निवेदन स्वीकारताना घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्यात व आंदोलकांमध्ये वादाला तोंड फुटले. आमदार देशमुख यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते निवेदन घेणार नसल्याची भूमिका जाहीर केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर व आमदार नितीन देशमुख या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आंदोलकांनी आमदार नितीन देशमुख यांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – हिवाळ्यात चंद्रपूरच्या प्रदूषणात वाढ; प्रदूषित दिवस वाढले मात्र धोकादायक प्रदूषणात घट

हेही वाचा – “भाजपचे हिंदूराष्ट्र मनुस्मृतीवर आधारित!” प्रा. श्याम मानव यांची टीका, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणीही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आला नसून सर्व समाजासाठी आले आहेत, असे आंदोलकांचे म्हणणे होते. अखेर आमदार देशमुख यांनी निवेदन स्वीकारले. दरम्यान, राज्यात शिवसेना ठाकरे गट व वंचित आघाडीमध्ये युती आहे. अकोल्यात मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधून विस्तव जात नसल्याचे चित्र आहे. त्याचा प्रत्यय मराठा आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा आला.