भंडारा : भंडारा येथील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलकडून बोलावण्यात आलेली एसटी ट्रान्सपोर्ट बँकेची सभा आज वादळी ठरली. मोठ्या गदारोळानंतर एसटी ट्रान्सपोर्ट बँकेची सभा संपवण्यात आली. यावेळी पोलिसांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. सदावर्तेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विरोधकांनी ठराव आणला. तर मारहाण केल्याप्रकरणी सदावर्तेंच्या समर्थकांनी भंडारा पोलिसांत तक्रार दिली.एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या एसटी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण ७१ वी सभा भंडाऱ्यात आयोजित करण्यात आली होती. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलकडून ही सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, एसटी कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही सभा अक्षरशः उधळून लावली. वार्षिक विशेषांकावर सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री रामचंद्र यांच्यासह नथुराम गोडसे यांचे छायाचित्र लावल्याचा मुद्दा धरत आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी वाद वाढला आणि विरोधकांनी अक्षरशः अहवालाची पुस्तकं फाडून फेकली.

तोडफोड, फेकाफेकी

वाद वाढल्यानंतर एकमेकांना धक्काबुकी करत खुर्च्यांची तोडफोड करून फेकाफेकी केली. यातील काही खुर्च्या पोलिसांनाही फेकून मारण्यात आल्या. एसटी कामगार कृती समितीनं सभेतून बाहेर पडत लगतच्या दुसऱ्या सभागृहात वार्षिक सभा आटोपली. तर, पदाधिकाऱ्यांनी ही सभा तहकूब केल्याचे घोषित केले.

हे ही वाचा… नागपूर : वादग्रस्त वक्तव्य टाळा, फडणवीस यांचा नितेश राणेंना सल्ला

तक्रार दाखल

गुणरत्न सदावर्ते यांच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी खुर्च्या फेकून मारल्या प्रकरणी विरोधकांच्या विरोधात भंडारा पोलिसांत तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे विरोधकांनी गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचारी सोडून बाहेरचे सभासद बनवले, बँकेत ३५ लाखांचा अपहार केला असा आरोप विरोधी एसटी कामगार कृती समितीने केला.

सदावर्तेंनी भ्रष्टाचार केला – विरोधकांचा आरोप

एसटी कामगार कृती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यावेळी म्हणाले की, जिथं सदावर्ते पती पत्नी आहेत, तिथं निश्चितपणे राडा आलाच. सदावर्ते यांनी एसटीच्या बाहेरचे सभासद बनविण्याचा कुटील डाव रचला आहे. एसटीच्या बाहेरील सभासद बनविल्यास बँक बुडण्याचा धोका आहे. आज भंडाऱ्यात पार पडलेली सभा ही कुठल्याही नियमानुसार, कायद्यानुसार झालेली नाही. ॲड. गुणरत्न सदावर्ते हे स्वतः वकील असून बँकेतून त्यांनी ३५ लाख रुपये लुटले. सदावर्ते यांच्यापर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत पारित केला. ३४ कोटींचे डेटा सेंटर आणलेत त्यात मोठा अपहार करण्यात आलेला आहे. सर्वसाधारण सभासदांना या सभेत बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे ही सभा उधळून लावली. सदावर्तेमध्ये दम असेल तर समोरासमोर यावं. हॉटेलमध्ये झोपा काढून बाउन्सर एसटीच्या सभासदांच्या अंगावर पाठवून भ्याडपणा करू नये.

हे ही वाचा…नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपाच्या बालेकिल्ल्यात देवेंद्र फडणवीसांना कुणाशी द्यावी लागेल लढत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसने बँकेची बदनामी केली – सदावर्ते पॅनेल

सदावर्ते गटाचे नितीन शिंदे म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही बँक सदावर्ते यांनी हिसकावली. सोन्याची अंडी देणारी बँक अशी काँग्रेसवाल्यांची धारणा होती. त्यामुळेच या सभेमध्ये त्यांनी हा राडा केला आहे. या बँकेच्या संचालक मंडळामध्ये सर्वसामान्य कर्मचारी चालक, वाहक, तांत्रिक यांना निवडून आणण्यात सदावर्ते यांची महत्त्वाची भूमिका होती. मागील ३० ते ४० वर्षांमध्ये ते करू शकले नाहीत, अशी काँग्रेस राष्ट्रवादीची धारणा झाली आणि त्यामुळेच बँकेला हा बदनाम करण्याचा प्रकार आहे.