गडचिरोली : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व शिंदेसेनेचे नेते गुरुवारी गडचिरोली दौऱ्यावर आले होते. पक्षाच्या बैठकीनंतर ते माघारी फिरताच दोन जिल्हाप्रमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने विश्रामगृहात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. नव्या कार्यकारीणीच्या घोषणेनंतर शिंदेसेनेत वादाची ठिणगी पडली होती. हे विशेष.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ७ ऑगस्टरोजी पाहिल्यांदाच गडचिरोली दौऱ्यावर आले होते. सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर त्यांनी आपला दौरा आटोपता घेतला. मात्र, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना होताच शिंदेसेनेतील दोन जिल्हाप्रमुखांमध्ये श्रेय वादावरून तुफान राडा झाला आणि ते एकमेकांवर भिडल्याचा प्रकार विश्रामगृहात बघायला मिळाला.
शिवसेना गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणून संदीप ठाकूर तर अहेरी जिल्हाप्रमुख म्हणून राकेश बेलसरे सध्या कार्यरत आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. त्यामुळे जिल्हाभरातील शिवसेना पदाधिकारी येथे उपस्थित होते. मात्र, मंत्री भुसे चंद्रपूरकडे रवाना होताच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेय वादावरून हमरीतुमरी झाली. यावेळी दोघांचे कार्यकर्तेही एकमेकांवर भिडले. त्यामुळे शिंदे सेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हा वाद झाल्याने पक्षाला याचा फटका बसू शकतो.
ग्रामस्थांनी शिक्षणमंत्र्यांचा ताफा अडवला
गडचिरोली-नागपूर मार्गावरील काटली गावात गुरुवारी सकाळी सपाच वाजताच्या सुमारास एका भरधाव ट्रकनने सहा मुलांना चिरडले. त्यात चार जणांचा मृत्यू झाला. दोघांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आले असून या घटनेनंतर काटली गाववासियांनी तब्बल पाच तास नागपूर मार्गावरील वाहतूक रोखून धरली. दरम्यान, गडचिरोलीच्या दौऱ्यावर असलेले शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांची समजूत काढली. त्यामुळे 5 तासानंतर येथील वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे, या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव भांड्याप पडला. मात्र, अपघातात चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळव्यक्त होत आहे..