अकोला: ‘जिल्हाधिकारी महोदयांसोबत कॉफी घ्यायची?, मग ५०० जलतारे पूर्ण करा ना…!’ या प्रेरणादायी घोषणेनंतर वाशीम जिल्ह्यात जलतारा अभियानात उल्लेखनीय प्रगती झाली. त्या गावाच्या प्रतिनिधींसह जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी ‘कॉफी विथ कलेक्टर’ हा विशेष कार्यक्रम घेतला. यावेळी उपक्रमात सहभागी गावकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधून उपक्रमाच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

वाशीम जिल्ह्यात जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणासाठी जलतारा उपक्रम सुरू केला. एका शोषखड्ड्याद्वारे ३.८० लाख लिटर पाणी मुरवता येते. त्यामुळे सिंचनाची उपलब्धता वाढून उत्पन्न दुप्पट होण्याची शक्यता आहे. मनरेगाच्या माध्यमातून ७५ हजार ३९६ शोषखड्ड्यांचे काम सुरू असून, यासाठी ३७.६९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या चळवळीत सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग आहे.

गाव पाणीदार होण्यासाठी २४ तालुकास्तरीय आणि एक हजार ४५० गावसभांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ५०० हून अधिक जलतारे पूर्ण करणारे सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, ग्राम रोजगार सेवक आणि ‘वॉटर हिरोज’ यांचा जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थितांच्या हस्ते सत्कार केला. कोंडाळा झामरे, लाडेगाव, तामसाळा, वाघी खूर्द, नागठाणा, गायवळ आदी गावांतील ‘वॉटर हिरोज’ समवेत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी संवाद साधला.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘जलतारा अभियान हे केवळ जलसंधारणाचे नव्हे, तर ग्रामीण समाजाच्या सहभागातून घडणाऱ्या शाश्वत विकासाचे उदाहरण आहे. ५०० जलतारे पूर्ण करणे ही केवळ संख्या नसून, गावकऱ्यांची एकजूट, श्रमप्रतिष्ठा आणि पर्यावरणाप्रतीची बांधिलकी याचे प्रतीक आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी ‘कॉफी विथ कलेक्टर’च्या माध्यमातून मिळाली.’

जलतारा योजनेला गती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा स्वामी विवेकानंद शिक्षण व व्यायाम प्रसारक मंडळ धनज बु .चे अध्यक्ष नीलेश सोमाणी यांनी मातोश्री स्व. स्नेहलता सोमाणी यांच्या स्मृतिनिमित्त एक लाख एक हजार एकसे अकरा रुपयाची देणगी धनज बु येथील जलतारासाठी दिली. ॲड. अनुप बाकलीवाल यांनी‌ एक लक्ष रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. सूत्रसंचालन अविनाश मारशेटवार यांनी केले.

वाशीम जिल्ह्यातील जलतारा उपक्रम जलसंपत्तीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे. या कार्यक्रमांमुळे गावपातळीवर काम करणाऱ्या जलदुतांना आवश्यक प्रोत्साहन लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.