यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. गेल्या पाच दिवसांपासून तापमान सतत ४३ अंश सेल्सिअसच्या वर आहे. शासनाच्याच आदेशानुसार शाळांमध्ये अद्याप परीक्षा सुरू आहेत. मात्र, वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकाऱ्यांनी नर्सरी ते सातवी पर्यंतच्या शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश आज बुधवारी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसात उन्हाचा पारा वाढला आहे. या उष्णतेचा चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी नर्सरी ते ७ वी पर्यंतच्या सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

अधिनियमातील कलम २५ मधील पोटकलम २ मध्ये प्राधिकरणांतर्गत जिल्हाधिकारी यांना अध्यक्ष म्हणून आपत्तीच्या प्रसंगी कार्यवाही, आदेश, निर्णय घेणे इत्यादीबाबत अधिकार प्राप्त झालेले आहे. त्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहे. भारतीय हवामान विभाग नागपुरने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार यवतमाळचे तापमान १६ एप्रिल रोजी ४३.४ सेल्सिअस, १७ ला ४३.४, १८ ला ४३.५, १९ ला ४३.५, २० ला ४३.६, २१ ला ४३.४ तर २२ एप्रिल रोजी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मागील सात दिवसात  यवतमाळ जिल्ह्यातील तापमान दररोज वाढत आहे.

त्यामुळे उष्ण तापमानाचा परिणाम प्राथमिक वर्गामध्ये नर्सरी ते वर्ग सातवीपर्यंत शिकत असलेल्या मुलांच्या आरोग्यवार होऊ नये, याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे अध्यक्ष विकास मीना यांनी उष्णतेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नियोजित असलेल्या परीक्षा वगळता नर्सरी ते वर्ग सातवीपर्यंत सुरु असलेल्या शासकीय व निमशासकीय शाळा पुढील आठ दिवस सकाळी ७ ते १० वाजतापर्यंत सुरु ठेवण्यात याव्यात, असे आदेश निर्गमित केले आहे.

हे आदेश सर्व शासकीय व निमशासकीय शाळांना लागू राहील, असे आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. या आदेशामुळे खासगी शाळा व्यवस्थापनाची तारांबळ उडाली आहे. दोन शिफ्टमध्ये शाळा भरणाऱ्या शाळांची या निर्णयाने गोची झाली आहे. सध्या शासकीय, निमशासकीय सरकारी शाळा सकाळच्या सत्रातच सुरू आहेत. राज्य शासनाने या शाळांमधील परीक्षेचा कालावधी लांबविल्याने ग्रामीण भागातील ये जा करणाऱ्या मुलांची उन्हामुळे होरपळ होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठ दिवसानंतर तापमान आणखी वाढले तर…

ही होरपळ थांबविण्यासाठी सकाळच्या सत्रात शाळेचा वेळ कमी करण्याची मागणी होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ पुढील आठ दिवस शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश दिल्याने त्यानंतर तापमान वाढले तर काय, याबाबत शाळा स्तरावर संभ्रम निर्माण झाला आहे.