नागपूर : मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपीखाली शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याच्या मार्फत होणारी अजब गांजा तस्करी गुरुवारी जिल्हा न्यायालयातील पोलीसांनी हाणून पाडली. खुनाच्या आरोपीखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला पेशीसाठी आणले असता तोच हा गांजा एका अजब गजब प्रकाराने लपवून कारागृहात नेणार होता.
विशेष म्हणजे त्याला जो गांजा पोचवला जाणार होता, तोही इतक्या सराईत मार्गाने प्लास्टिकच्या पिशवीत बांधण्यात आला होता, की पाहणाऱ्याला आत काय आहे, हे कळालेही नसते. अत्यंत बारकाईने आणि सुनियोजित रितीने ही तस्करी केली जाणार होती.
कैद्याला तो गांजा पोचवण्यासाठी तीन जण ठरल्या प्रमाणे गुरुवारी न्यायालय परिसरात येणार होते. याची कुणकूण लागल्यानंतर ही गुप्त माहिती जिल्हा न्यायालयातील हेड कॉन्स्टेबल सुनिल तिवारी यांना मिळाली. तिवारी यांनी खबऱ्याकडून मिळालेली ही टीप जिल्हा न्यायालयातील पोलीस निरीक्षक निरीक्षक मनिष बनसोड यांच्या कानावर टाकली. त्यानंतर पोलीस चौकीला अलर्ट देण्यात आला.
खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेला कैदी वैभव देशमुख हा गुरुवारी पेशीसाठी न्यायालयात येताच गांजा पोचवण्यासाठी आलेले तिघेही पेशी सुरू होती त्या न्यायालय परिसरात आले. रवी विलास धांडे, अनुज राजू नागपूरे आणि तिसरा अल्पवयीन आरोपी जिल्हा न्यायालयात घुटमळताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी तिघांनाही चौकीत आणून चौकशी केली असता रवी विलास धांडे याने खिशात लपवलेल्या गांजाच्या पुंगळ्या बाहेर काढल्या. धक्कादायक बाब म्हणजे रवी धांडे याची १५ दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटका झाली आहे.
मोक्का अंतर्गत तो ७ वर्षे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगून आला होता. जिल्हा न्यायालय पोलीस चौकीतील हेड कॉन्स्टेबल तिवारी यांना त्याच्याकडेच हा गांजा सापडला. धक्कादायक बाब म्हणजे हा गांजा खुन प्रकरणात शिक्षा भोगत असलेला कैदी वैभव देशमुखमार्फत ‘ प्रायव्हेट पार्ट’मध्ये (गुदद्वारात) लपवून कारागृहात पोचविला जाणार होता. कैद्यांसाठी गांजा तस्करी करणारा तिसरा आरोपी हा अल्पवयीन आहे. अजब मार्गाने होणारी ही गांजी तस्करी हाणून पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक बनसोड, हेड कॉन्स्टेबल तिवारी, शोएब शेख, प्रितम ठाकूर, चंद्रशेखर फिसके मोलाचे सहकार्य केले. जिल्हा न्यायालय पोलिसांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तिन्ही गांजा तस्करांना अटक केली. सदरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी याला दुजोरा दिला.
तस्कर निघाला मोक्काचा कैदी
कैद्यांसाठी गांजा तस्करी करणारा रवी धांडे हा मोक्काचा आरोपी आहे. तो १५ दिवसांपूर्वीच कारागृहातून सूटून बाहेर आला आहे. त्यानेच अजब मार्गाने कारागृहात होणाऱ्या या गांजा तस्करीचा डाव रचला होता. कारागृहात राहून आल्याने त्यानेच अत्यंत सुनियोजितरित्या हा कट रचला होता, असेही आढळले आहे.