अमरावती : नियतीने जन्मतःच बेवारस आणि मूकबधिर म्हणून जीवनाच्या संघर्षात फेकलेल्या एका मुलीला शंकरबाबांनी वडील म्हणून नाव दिले. त्या वैशाली पापळकर यांना, तब्बल सात वर्षांच्या संसारानंतर मातृत्वाचे अनमोल वरदान मिळाले आहे. या भावनिक क्षणाचे औचित्य साधून विभागीय धर्मादाय आयुक्त दीपक खोचे यांनी सपत्नीक, त्यांच्या कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने वैशालीचा साडीचोळी देऊन सत्कार आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केला. 

वैशाली पापळकर हिचा जीवनप्रवास हा एखाद्या संघर्षमय कादंबरीसारखा आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी नाशिक येथे कुंभमेळ्याच्या पर्वावर नदीकाठी ती बेवारस आणि मूकबधिर अवस्थेत पोलिसांना सापडली. बोलता-ऐकता न येणाऱ्या या बालिकेचे ‘वैशाली’ असे नामकरण बालकल्याण मंडळाने केले आणि त्यानंतर तिला वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य दिव्यांग बालगृहाचे संचालक डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात देण्यात आले.

शंकरबाबांनी या कन्येला मायेची ऊब देत संत गाडगेबाबा मूकबधिर विद्यालयामध्ये चौथ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण दिले. नंतर तिने अंबादासपंत वैद्य बालगृहात अधीक्षक या पदावर राहून अनेक दिव्यांग मुला-मुलींची सेवा केली. पुढे तिची बदली स्वर्गीय गेंदीबाई श्रीनिवास अग्रवाल मतिमंद विद्यालय, परतवाडा येथे शिपाई पदावर झाली.

वैशालीच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण दिनांक ९ फेब्रुवारी २०१९ रोजी आला. त्यावेळी अमरावती जिल्ह्याचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांनी तिचे कन्यादान करून तिला ‘बेवारस’ ओळखीतून कायमचे मुक्त केले. विशेष म्हणजे तिचा जीवनसाथी अनिल हासुद्धा मूकबधिर बेवारस असून डोंगरी रिमांड होममधून अंबादास पंत वैद्य बालगृहात दाखल झालेला होता. दोघांचा विवाह शंकरबाबांच्या प्रयत्नातून मोठ्या थाटात पार पडला.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे भाग्य!

लग्नाच्या तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वैशालीच्या जीवनात आई होण्याचे सौभाग्य लाभले. नुकतीच विभागीय धर्मादाय आयुक्त दीपक खोचे साहेब यांनी अचानक बालगृहाला भेट दिली. याचवेळी माझ्या या मुलीला सातव्या महिन्यानिमित्त साडीचोळी देऊन तिचा सत्कार करावा, अशी विनंती शंकरबाबांनी केली. तत्काळ प्रतिसाद देत खोचे यांनी ‘हे तर आमच्या कार्यालयाचे मोठे भाग्यच आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आज डोहाळे जेवनाचा सोहळा पार पडला. एका बेवारस कन्येचे डोहाळे पुरवण्याची शासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका सेवाभावी आणि धर्मादाय कार्याला नवी दिशा देणारी असून, ही घटना इतिहासात नोंद घेण्यासारखी आहे, अशी प्रतिक्रिया शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली.