नागपूर : जॉर्जिया येथील बातुमी येथे आयोजित फिडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ वर अवघ्या १९ व्या वर्षी नागपूरच्या दिव्या देशमुखने आपली मोहर उमटवून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. ८८ वी भारतीय ग्रँडमास्टरचा किताब मिळवल्यावर दिव्याचे बुधवारी रात्री नागपुरात आगमन झाले. यावेळी शहरवासीयांनी जल्लोषात दिव्याचे स्वागत केले.
बुद्धिबळाच्या पटलावर उत्तुंग कामगिरी करून संत्रानगरीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दिव्याचे रात्री ९.३० च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. दिव्याचे स्वागत करण्यासाठी क्रीडाप्रेमींनी विमानतळ परिसरात गर्दी केली होती. पुष्पवर्षाव करत दिव्यांचे कौतुक करण्यात आले. ढोल ताशांच्या गजराने संपूर्ण विमानतळ परिसर निनादला. एका खुल्या जीपवर दिव्या विमानतळ परिसरातून बाहेर पडली.
तत्पूर्वी दिव्याचे आगमन होताच तिच्या कुटुंबीयांनी तिला गुलाबाचा मुकुट घातला. यानंतर तिच्यावर पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. क्रीडाप्रेमींनी फलकांवर दिव्यासाठी शुभेच्छा संदेश लिहून आणले. माध्यम प्रतिनिधी तसेच क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येत गर्दी केल्याने काही काळाकरिता विमानतळावर अव्यवस्थेचे वातावरण बघायला मिळाले. दिव्याचे स्वागत करण्यासाठी दिव्याचे संपूर्ण कुटुंबीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके तसेच माजी महापौर दयाशंकर तिवारी, अर्चना डेहनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
वडिलांना घट्ट मिठी
विमानतळातून बाहेर पडताच दिव्या वडिलांकडे गेली. त्यांचे चरणस्पर्श केल्यावर तिने त्यांना घट्ट मिठी मारली. यापूर्वी दिव्याच्या आजीने तिला हार घातला. दिव्यासाठी विशेष व्यंजन तयार केले असल्याची माहिती दिव्याच्या आजीने दिली. प्रसार माध्यमांनी दिव्याल्या गराडा घातल्याने तिच्या आजीने चिंता व्यक्त केली, मात्र कुटुंबीयांनी तसेच उपस्थित पोलिसांनी सुरक्षेबाबत आश्वस्त केले.
प्रशिक्षकांना विजय अर्पण
माझ्या यशाचे श्रेय माझ्या सर्व कुटुंबीयांना आहे. माझी बहीण, काकू, आजी या सर्वांचे यात योगदान आहे. माझे पहिले प्रशिक्षक राहुल जोशी यांना मी ग्रँडमास्टर व्हावी असे वाटायचे. हा विजय त्यांना अर्पण करते, अशी प्रतिक्रिया दिव्याने दिली.