अकोला : दिव्यांचा सण दिवाळीनिमित्त कोटय़वधी रुपयांचे फटाके फोडले जात आहेत. त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना धुळीस मिळाल्याचे चित्र आहे. कर्णकर्कश आवाज व धुरामुळे आरोग्यासह पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणारी आतषबाजी होत आहे. याविरोधात विविध स्तरावर राबवण्यात येत असलेली जनजागृती मोहीम थंडावल्याचे चित्र यावर्षी दिसून आले. फटाक्यांमधून निळा, पिवळा, हिरवा, लाल, जांभळा रंग निघण्याकरिता अॅल्युमिनिअम, अँन्टमनी सल्फाईड, बेरियम नायटनेट, तसेच तांबे, शिसे, लिथियम, स्टनॅन्शयम, अर्सेनिक यासारख्या घटकांचा वापर केला जातो. फटाके फोडल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे अनेक दुर्धर व्याधी होतात. गर्भात असलेली मुले व नवजात मुलांना तर हा अधिकच घातक. यासोबतच एकाच दिवशी मोठय़ा प्रमाणात धूर निघत असल्यामुळे अनेक कीटक, किडे नाश पावतात. आग लागणे, मुले भाजण्याचे प्रकार घडतात. मात्र, याकडे दुर्लक्ष करून लक्ष्मीपूजनाला फटाके फोडण्याचा मनमुराद आनंद नागरिकांनी लुटला.
दिवाळीमध्ये मोठय़ा आवाजात फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे पक्ष्यांना नुकसान पोहचते. त्यामुळेही फटाके कमी प्रमाणात फोडण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले होते. मात्र, त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. अभ्यंगस्नानापासून सुरू झालेली आतषबाजी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. काहींनी नियम डावलून रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्याचा आनंद घेतला.
प्रकाशमय दिवाळी साजरी करताना आपण प्रदूषणाची काळी सावली तर गडद करत नाही ना, हे पाहणे महत्त्वाचे आहे. हा प्रकाशाचा उत्सव म्हणून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करणे शक्य नाही. मात्र, आनंद देणाऱ्या फटाक्यांमधील स्फोटकांचा धोका वेळीच ओळखला तर दिवाळीचा निर्धास्तपणे आनंद लुटता येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
फटाके फोडण्याची स्पर्धा
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या या फटाक्यांमुळे लहान बालके, रुग्ण, अबाल वृद्ध आणि पशु-पक्षी यांच्यासह पर्यावरणालाही हानी पोहोचते. मात्र, याचा विचारच होत नाही. जणू काही फटाके फोडण्याची स्पर्धाच रंगत असल्याने उत्सवाचे स्वरूप विद्रूप होत चालले आहे. फटाक्यांमुळे मानवी शरीरावर गंभीर परिणाम होतात, हे माहीत असूनही मोठय़ा आवाजात फटाके फोडण्यात येत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही स्पर्धा दिसून येते.
मर्यादा ओलांडताहेत फटाके
दिवाळीतील फटाक्यांचा आवाज रक्तदाब वाढवू शकतो. कायमचे बहिरेपणही येऊ शकते. सुतळी बॉम्ब किंवा पॅरेटबॉम्बसारखे फटाके १२० डेसिबल आवाजाची मर्यादा ओलांडतात. मानवी कानांची ग्रहणक्षमता कमाल १२५ डेसिबल इतकी आहे. ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार फटाक्यांना आवाजाची मर्यादा ९० डेसिबल इतकी घालून देण्यात आली आहे. शांतता क्षेत्रात आवाजाची मर्यादा ५० डेसिबल आहे. मात्र, शांतता क्षेत्रातील आवाजाची पातळी सर्रास ओलांडली जाते. आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांची उंची राहत असल्याने, इमारतीत वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या रहिवाशांना १२० डेसिबलपेक्षाही मोठा आवाज सहन करावा लागत आहे.