नागपूर : जगभरात प्रसिद्ध असलेले डॉली चायवाला हे नागपूरमधील सिव्हिल लाईन्स परिसरात चहा विकणारे एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या चहा बनवण्याच्या अनोख्या शैलीमुळे आणि लक्षवेधी वेशभूषेमुळे ते सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध झाले आहेत. रंगीबेरंगी केस, स्टायलिश कपडे, मोठे गॉगल्स आणि रजनीकांतच्या अंदाजात चहा ओतणे ही त्यांची खास ओळख बनली आहे.
‘डॉली की टपरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या चहाच्या गाड्यावर रोज शेकडो ग्राहक येतात. युट्युबवर त्यांचा चॅनेल असून त्याला १३ लाखांहून अधिक सदस्य आहेत. इंस्टाग्रामवरही त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली, जेव्हा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स त्यांच्या टपरीवर चहा प्यायला आले. गेट्स यांनी स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर डॉली चायवाला रातोरात चर्चेत आले.
ते दररोज सुमारे ५०० ते ६०० कप चहा विकतात आणि महिन्याला अंदाजे दीड लाख रुपयांपर्यंत कमाई करतात. सोशल मीडियावर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्यांना विविध ब्रँड्ससोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. बिल गेट्स यांना चहा पाजल्यावर डॉली चायवाला यांचे जगभरात नाव झाले आणि त्यांनी दुबईसह जगभर दौरे देखील केले. आता याच डॉली चायवालाने खूप मोठा निर्णय घेतला आहे.
काय करणार डॉली चायवाला?
डॉली चायवाला हे मूळचे नागपूरचे असून गेली अनेक वर्षं ते सिव्हिल लाईन्स परिसरात “डॉली की टपरी” या नावाने चहा विक्री करत आहेत. लहानपणापासून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी चहा विकायला सुरुवात केली होती. कालांतराने त्यांनी चहा बनवण्याची शैलीच एवढी आकर्षक बनवली की, लोक त्यांच्या चहाच्या चवइतकीच त्यांची शैली पाहण्यासाठीही गर्दी करू लागले.
नागपूरचे प्रसिद्ध डॉली चायवाला यांनी आता आपल्या ‘डॉली की टपरी’ ब्रँडची फ्रँचायझी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर आपल्या हटके स्टाईल आणि चहा बनवण्याच्या खास पद्धतीमुळे प्रसिद्ध झालेल्या डॉली यांनी आपला व्यवसाय अधिक व्यावसायिक पद्धतीने विस्तारण्याची दिशा घेतली आहे. त्यांनी तीन प्रकारचे फ्रँचायझी मॉडेल बाजारात आणले असून, त्यात स्टॉल फॉरमॅट ₹४ ते ₹६ लाख, स्टोअर फॉरमॅट ₹२० ते ₹२२ लाख, तर फ्लॅगशिप स्टोअर ₹३९ ते ₹४३ लाख इतक्या किंमतीत उपलब्ध असतील.
विशेष म्हणजे नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात असलेली त्यांची मूळ टपरी अजूनही पादचारी मार्गावरील अतिक्रमण मानली जाते. मात्र त्यातूनही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करत एक छोटा व्यवसाय राष्ट्रीय स्तरावर नेण्याची धडपड सुरू ठेवली आहे. ‘डॉली की टपरी’ ही केवळ चहाची टपरी न राहता आता एक ब्रँड बनत चालली आहे, हे या फ्रँचायझी लाँचिंगमधून स्पष्ट होतं.