मोबाईलवरून वादात त्रिमूर्तीनगरात, तर दारू पिऊन शिविगाळीमुळे हुडकेश्वरमध्ये खून
गणेश उत्सवाचे दहा दिवस अतिशय शांततेत पार पडल्यानंतर शहरात खुनाचे सत्र सुरू झाले आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी क्षुल्लक भांडणातून दोन तरुणांचा खून करण्यात आला. या घटनांनी शहर हादरले आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
त्रिमूर्तीनगर चौकात शनिवारी संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास रोहित हत्तीबेंड (२४) रा. सुभाषनगर याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. काही दिवसांपूर्वी त्याने हर्षल निखार नावाच्या मित्राकडून एक मोबाईल मागितला होता. हा मोबाईल त्याने विकल्याची माहिती हर्षलला मिळाली. त्यामुळे हर्षल हा त्याला मोबाईल परत मागत होता. मात्र, रोहित हा मोबाईल परत करीत नव्हता. त्यामुळे दोघात वाद सुरू होता. शनिवारी संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास हर्षलने रोहितला त्रिमूर्तीनगर चौकातील ओरिएन्ट वॉईन शॉपजवळ बोलविले. त्या ठिकाणी हर्षल हा मित्र विनोद मसराम आणि चंद्रकांत नावाच्या मित्रांसोबत उभा होता. रोहित त्या ठिकाणी पोहोचताच हर्षल आणि त्याच्या मित्रांनी त्याला मोबाईल मागितला. त्याने नकार दिला असता त्यांनी चाकू रोहितच्या पोटात खुपसला आणि ते पळून गेले. यानंतर काहींनी रोहितला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी हर्षलला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. रोहितविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात मारहाण आणि दुखापत करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी हे फर्निचरचे काम करीत असल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरी घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मनोज हुद्दार (२९) रा. सावरबांधे ले-आऊट असे मृताचे नाव आहे. मनोजला फुफ्फुसाचा आजार आहे. कधीकधी पेंटिंगच्या कामावर जायचा. मात्र, बहुतांश वेळ तो बेरोजगार असायचा. काल शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता तो घरातून काही मित्रांसोबत बाहेर जेवण्यासाठी गेलेला होता. त्यानंतर पहिले मित्र सोडले व दुसरे मित्र पकडले. त्याने मित्रांसोबत एका ठिकाणी दारू प्यायली होती. या वादातून त्याचा खून झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास सौभाग्यनगर परिसरातील रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह पडला होता. सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना त्याचा मृतदेह दिसला आणि त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मृत हा परिसरात परिचयाचा असल्याने त्याची ओळख पटविण्यात फारसे परिश्रम घ्यावे लागले नाही. मात्र, आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी तीन युवकांना ताब्यात घेतले आहे.