नागपूर: फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. या गुन्ह्यातील आरोपीवर कठोर कारवाईसह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमधील निवासी आणि वरिष्ठ डॉक्टरांनी काही कामांवर सोमवारी सकाळपासून बहिष्कार घातला आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊन त्यांचे जीव टांगणीला लागले आहेत.

नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल रुग्णालय) तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो रुग्णालय) या दोन्ही रुग्णालयांसह राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहेत. सोमवार हा बाह्यरुग्ण सेवेवर बहिष्कार टाकण्याचा पहिला दिवस आहे.

या दोन्ही रुग्णालयांत विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांतील गरीब रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. त्यामुळे त्यांना या आंदोलनाचा मोठा फटका बसणार आहे. आंदोलकांनी सांगितले की, डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी सर्व डॉक्टर संघटना एकत्र आल्या असून, ३ नोव्हेंबरपासून सर्व संघटनांनी कामावर बहिष्कार सुरू केला आहे.

आंदोलक डॉक्टरांचे म्हणणे आहे की, डॉ. संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अनेक दिवस लोटले तरी त्यांच्या परिवाराला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील सर्व डॉक्टर संघटना या विरोधात एकत्रितपणे आंदोलन करत आहेत. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय शिक्षण खात्याअंतर्गत असलेल्या रुग्णालयांतील सर्व डॉक्टर संघटनांनी कामावर बहिष्कार जाहीर केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर कायद्याच्या चौकटीत राहून शिस्तबद्ध आंदोलन करत आहेत. त्यामुळे आरोग्यव्यवस्थेवर येणाऱ्या ताणासाठी प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी नमूद केले.

जाहीर आंदोलनानुसार, २ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात निवासी डॉक्टरांसह महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेने कँडल मार्च काढला.

आजचे आंदोलन काय राहणार?

३ नोव्हेंबरपासून निवासी डॉक्टरांची मार्ड संघटना, एमएसआरडीए, एएसएमआय या संघटना राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि शासकीय रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण सेवेवर बहिष्कार टाकतील. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. त्याचबरोबर मॅग्मो, आयएमए आणि एएमओ या संघटना सर्व प्रशासकीय बैठका व व्हिडिओ कॉन्फरन्सवर बहिष्कार करतील. ७ नोव्हेंबरपासून मॅग्मो आणि आयएमए या संघटनाही बाह्यरुग्ण सेवेवर बहिष्कार टाकतील. मागण्या मान्य न झाल्यास १४ नोव्हेंबरपासून सर्व आपत्कालीन सेवा बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

वरिष्ठ डॉक्टरांकडे जबाबदारी

नागपूरमधील मेडिकल व मेयोसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील वरिष्ठ डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. या डॉक्टरांकडे बाह्यरुग्ण विभागातील सेवेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासून बाह्यरुग्ण विभागात वरिष्ठ डॉक्टर सेवा देत असल्याचे चित्र दिसून आले.