माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आपल्या भावाच्या मृत्यूस डॉ.विश्वास झाडे जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. अहिर यांचे लहान भाऊ हितेंद्र अहिर यांना १२ जानेवारी रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना अतिशय गंभीर अवस्थेत उपचारासाठी डॉ.झाडे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी महिना उलटल्यानंतर अहिर यांनी ही मागणी केली आहे.

हेही वाचा >>>नागपूर: विद्यापीठाच्या परीक्षेत पुन्हा चुका; जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका

माजी राज्यमंत्री अहीर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ.झाडे यांचे हॉस्पिटल गाठून त्यांची चौकशी केली. यानंतर पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अहिर यांनी डॉ. झाडे यांच्या हॉस्पिटलमध्ये भावाला सकाळी १०.३० वाजता उपचारार्थ दाखल केले होते. मात्र डॉ. झाडे यांनी उपचारात हलगर्जीपणा केला. त्याचा परिणाम भावाचा मृत्यू झाला असे म्हटले असल्याचे उपविभागीय अधिकारी नंदनवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे डॉ. विश्वास झाडे यांनी २०१९ मध्ये अचानक राजकारणात सक्रिय होऊन बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून विद्यमान पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्ध निवडणूक लढली होती. त्यात त्यांनी ५६ हजारापेक्षा अधिक मते घेतली होती. तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचा प्रचार केला होता.

हेही वाचा >>>नागपूर विद्यापीठाची निविदा प्रक्रिया वादात; विशिष्ट कंपनीच्या लाभासाठी इतरांना जाचक अटी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. झाडे यांचा समाजात प्रभाव आहे. आता माजी मंत्री अहिर यांनी थेट भावाच्या मृत्युला जबाबदार असल्याची तक्रार केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना डॉ. झाडे म्हणाले की, हितेंद्र अहिर यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणले होते. अवघ्या पाच मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला. यात माझी चूक नाही.” मात्र, या तक्रारीवरून पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत. या तक्रारीमुळे येत्या काळात पुन्हा एकदा राजकारण चांगलेच तापणार आहे.