उत्पन्न वाढीसाठी ‘एसटी’चा प्रयोग

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्न वाढीसाठी आता कल्पक प्रयोग करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आता एसटीच्या प्रवासी वाहतूक नियोजनात चालक-वाहकांचाही सहभाग असणार आहे. या कर्मचाऱ्यांनी प्रवासी वाढीसाठी नवीन संकल्पना सुचवायच्या आहेत.

राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून  एसटीची आर्थिक स्थिती ढासळली आहे. कर्मचाऱ्यांना वेतनही वेळेवर मिळत नाही.  एसटीचे सर्वाधिक उत्पन्न प्रवासी वाहतुकीवर अवलंबून आहे.  राज्यातील बहुतांश भागात करोनाचा प्रभाव कमी झाल्याने एसटीची प्रवासी वाहतूक  रुळावत येत आहे.  दुसरीकडे डिझेलचे दर वाढल्याने खर्चावर नियंत्रणाचेही नवीन आव्हान एसटीसमोर आहे. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी  परिवहन महामंडळ चालक-वाहकांनाही नियोजनात सहभागी करून घेणार आहे. या योजनेनुसार बाराही महिने वेळापत्रकानुसार सेवा देणाऱ्या चालक-वाहकांसह वाहतूक नियंत्रक यांना बससेवेच्या नियतांच्या वेळा, थांबे, मार्ग, वाहनांचा प्रकार, उत्पन्न वाढवणे, नवीन बसगाडी सुरू करणे इत्यादीबाबत आपली सूचना आगार व्यवस्थापकाकडे लेखी स्वरूपात द्यावी लागेल. ही सूचना तक्रार किंवा अन्य स्वरूपात नको. ही सूचना मिळाल्यानंतर आगार व्यवस्थापक संबंधित कर्मचाऱ्याचे एसटी महामंडळाप्रती दाखवलेल्या आस्थेबद्दल आभार व्यक्त करणार आहेत. या  सूचनांचा आगार व्यवस्थापकांनी अभ्यास करून, आवश्यकता असल्यास संबंधित चालक-वाहकाशी चर्चा करून त्यांची पडताळणी करून आगार पातळीवर  अंमलबजावणीही करायची आहे. सोबत विभागीय पातळीवरचा विषय असल्यास विभाग नियंत्रकाकडे व मध्यवर्ती पातळीवरचा विषय असल्यास एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे ही सूचना वर्ग करायची आहे.

नोंदवहीत सूचनांची नोंद सक्तीची

चालक-वाहकांकडून आलेल्या सूचनांची आगार पातळीवर, विभागीय पातळीवर  संबंधित अधिकाऱ्यांना नोंद करणे सक्तीचे करण्यात आले आहे. ही सूचना आगार व्यवस्थापक, विभागीय पातळीवर, मध्यवर्ती पातळीवरची असल्यास तेथे कधी पाठवली, हेही नोंदवहीत नमूद करायचे आहे. सोबत या नोंदीचा दरमहा संचित गोषवाराही तयार करायचा आहे.

‘‘या योजनेला नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयात चांगला प्रतिसाद आहे. आजपर्यंत येथे विविध आगारातून ३२ सूचना आल्या. त्यावर आगार स्तरावर बैठकीही झाल्या. यातील प्रवासी हिताच्या सूचनांवर लवकरच अंमलबजावणी होईल.’’

– नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक (नागपूर), एसटी महामंडळ.