नागपूर : दारूचे व्यसन आणि उसने घेतलेले पैसे यावरून कधी काय घडेल, याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. असाच काहीसा प्रकार दोन दिवसांपूर्वी नागपूरात घडला. उसने दिलेले पैसे परत मिळत नसल्याने संतापलेल्या एकाने आपल्याच मित्राचा दगडाने ठेचून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे दारूच्या नशेत केलेले हे कृत्य ही त्याला आठवत नव्हते. त्यामुळे घडलेल्या खूनावरून निर्माण झालेले गुढ सोडवता सोडवता पोलिसांच्या डोक्याचा भूगा झाला.
हिवरी नगरातील जय भीम चौकातल्या आशय किराणा स्टोअर्स जवळ मंगळवारी झालेल्या राजेश धनविजय (३०) याच्या खुनाचे गुढ उलगडण्यात अखेर नंदनवन पोलिसांना दोन दिवसांनी गुरुवारी यश आले. उधारीच्या अवघ्या ३०० रुपयांवरून हा खून झाल्याचे पोलीसांनी केलेल्या तपासात स्पष्ट झाले. हा खून करणारा त्याचाच मित्र आहे. आदल्या दिवशी या दोघांनी सोबत बसून दारू प्याली होती.
विश्वनाथ पटेल आणि भाऊराव अवसरे अशी अवघ्या ३०० रुपयांसाठी खून करणाऱ्यांची नावे आहेत. आरा मशीनवर मजुरीची कामे करणाऱ्या राजेश धनविजयचा ज्या ठिकाणी खून झाला ते घरही खुनातला सह आरोपी भाऊरावचेच आहे. हे तिघेही दारूच्या आहारी गेलेले व्यसनी आहेत. यातला मुख्य आरोपी विश्वनाथ पटेलने राजेशला काही दिवसांपूर्वी ३०० रुपये उसने दिले होते. ते पैसे विश्वनाथ राजेशकडे मागत होता. घटनेच्या आदल्या दिवशीही यावरून दोघांत वाद झाला. मात्र तरीही राजेश उसने पैसे परत करत नसल्याने दोघांत कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी तिघेही दारूच्या नशेत होते.
संतापच्या भरात विश्वनाथने सिमेंटची वीट राजेशच्या डोक्यात घातली. त्याचा खून केल्यानंतर रात्री ३ वाजता भाऊराव दारूच्या नशेत बाहेर येऊन बडबड बसला. त्यावरून खूनाच्या घटनेचा उलगडा झाला. जिथे हा खून झाला तेथून विश्वनाथचे घर काही अंतरावरच घर आहे. मात्र तो गेल्या ११ वर्षांपासून तो घरी गेलेला नाही. हे तिघेही अनेक वर्षांपासून अवसरेच्या घरातच रोज दारू पित होते, असे स्पष्ट करीत नंदनवन पोलीसांनी विश्वनाथ विरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याचे सांगितले.