गडचिरोली : दारुबंदी असतानाही गडचिरोली जिल्ह्यात दारू पिण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनेकदा सरकारी कर्मचारी दारू पिऊन कार्यालयात येत असल्याचे चित्र नवे नाही. यात कुरखेडा तालुक्यातील तलाठ्याची भर पडली असून मद्यधुंद अवस्थेत सातबाऱ्यावर स्वाक्षरी करता करता जमिनीवर कोसळल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या सजा क्रमांक ८ सोनेरांगी येथे किशोर राऊत हे तलाठी पदावर कार्यरत आहेत. गेल्या ८ दिवसांपासून ते कार्यालयात मद्यपान करून येत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. तलाठी दारूच्या नशेत असल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून शेतीसाठी लागणारे सातबारे तसेच दाखल्यांची कामे होत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, बुधवारी सोनेरांगी गावातील काही शेतकरी शेतीविषयक कामासाठी तलाठी कार्यालयात गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी राऊत यांच्याकडे काही कागदपत्रांवर सही करण्याची विनंती केली. मात्र, दारूच्या नशेत असल्याने राऊत यांना सही करण्याचीदेखील शुद्ध नव्हती.
हेही वाचा – नागपूर : हिना खानच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना, चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण
सही करता-करता अचानक राऊत हे जमिनीवर कोसळले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्यांना उचलून बाजूच्या खोलीत नेत एका खाटेवर झोपवले. ही चित्रफीत सार्वत्रिक झाल्याने खळबळ उडाली आहे.