वाशीम : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, आरोग्य सेवेतील जवळपास १७ हजार कर्मचाऱ्यांनी आज, मंगळवार १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरला असून शासकीय कामे ठप्प झाली आहेत. आरोग्य सेवाही प्रभावित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… नागपूर: संपात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना नोकरीवरून काढण्याच्या धमक्या, शिक्षक संघटना आक्रमक

मागील काही दिवसांपासून राज्यात जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने अखेर आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच इतर शासकीय, निमशासकीय कार्यालयातील १७ हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे कार्यालये ओस पडली असून तेथे केवळ दोन-तीन कर्मचारी उपस्थित आहेत.

हेही वाचा… मेडिकल, मेयो, सुपरच्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या, रुग्णांचा जीव टांगणीला; परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचारीही संपावर

जिल्हा सामान्य रुग्णालयातील बहुतांश कर्मचारी संपात सहभागी झाल्याने रुग्ण सेवा कोलमडू नये यासाठी नवख्या व शिकाऊ विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी सेवा देताना दिसून आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५३ उपकेंद्रे आणि ५८ पशू वैद्यकीय रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी देखील संपात सहभागी झाले आहेत. अशा ठिकाणी एन.आर.एच.एम. व इतर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. एकंदरीत, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून आरोग्य सेवेवर देखील प्रचंड ताण वाढला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to government employees strike routine government work affected in washim district medical service disturbed pbk 85 asj
First published on: 14-03-2023 at 14:03 IST