नागपूर : शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या प्रचंड गैसयोयीसाठी महापालिकेसह संबंधित विभागाच जबाबदार आहे, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत यापुढे कुठेही पाणी साचणार नाही, याची १५ दिवसात व्यवस्था करा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. पाणी साचल्यास संबंधित विभागाला जबाबदार धरण्याचा इशाराही त्यांनी दिला.
एक आठवड्याहून अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूर जलमय झाले असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे. पुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याची दखल घेत गडकरी यांनी शुक्रवारी महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. गडकरी म्हणाले, रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी खरे तर संबंधित विभागाची होती. पण ती त्यांनी पार पाडली नाही. पावसाळा आला तरी कामे अपूर्ण आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यांवर व वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले. २०११ मध्ये सुरू झालेली स्त्यांच्या पहिल्या टप्प्याची कामे २०२२ मध्येही अपूर्ण आहेत. ज्या रस्त्यावर पाणी साचले, त्याची माहिती दोन दिवसात सबंधितांना कळवा. शहरात कुठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश यावेळी गडकरी यांनी दिले. या बैठकीला आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता सरदेशमुख उपस्थित होते.
‘ड्रेनेज सिस्टिम’ प्रस्ताव तयार करा
पाणी तुंबण्यासाठी जुनी झालेली ‘ड्रेनेज सिस्टिम’ आणि अधिक प्रमाणात झालेला पाऊस ही कारणे अधिकाऱ्यांनी दिली. त्याावर ‘ड्रेनेज सिस्टिम’ प्रस्ताव तयार करा, निधीची चिंता करू नका, असे गडकरींनी सांगितले.