अकोला : तंबाखूमुळे दरवर्षी आठ लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली. तंबाखूच्या सेवनामुळे हृदयाला त्रास, रोग, पक्षाघात, कर्करोग होतो. मधुमेहाचा धोका देखील वाढतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी ३१ मे रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तंबाखूच्या धोक्याबद्दल जनजागृती करणे हा आहे. तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्युच्या वाढत्या आकडेवारीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने १९८७ मध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन सुरू केला.

तंबाखू सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा किंवा मूत्राशयाचा आदी कर्करोग होऊ शकतात. तंबाखूमुळे हृदय आणि रक्त वाहिन्यांसचे विकार, हृदयरोग, छातीत दुखणे, हदयविकाराच्याक झटक्यामुळे अचानक मरण येणे, मेंदूचा विकार, परिधीय संवहनी रोग होतात. तंबाखू हे क्षयरोग होण्याचे अप्रत्यक्ष कारण आहे. धूम्रपान किंवा तंबाखूच्या सेवनामुळे अचानक रक्तदाब वाढतो. तंबाखूमुळे रक्तातील चांगले कोलॅस्ट्राँलचे प्रमाण कमी होते.

सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका दोन ते चार पटीने जास्त असतो. सिगारेटमधील निकोटीन आणि टार रक्तवाहिन्यांना अरुंद करतात. रक्ताभिसरण बाधित होऊन हृदयविकारांचा धोका वाढतो. सिगारेट ओढण्यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते. सिगारेटचा धूर तुमच्या त्वचेतील आर्द्रता आणि आवश्यक पोषक तत्वं काढून घेतो, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, वांग आणि निस्तेज त्वचा दिसू लागते. सिगारेट ओढल्याने किडनी कॅन्सर होण्याचा धोका ५० टक्क्यांपर्यंत वाढतो. किडनी हळूहळू खराब होऊ लागते.

सिगारेटचा धूर डोळ्यांच्या नाजूक रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो. रक्तप्रवाह मंदावतो आणि दृष्टी कमकुवत होऊ लागते. दीर्घकाळ धूम्रपान केल्याने मोतीबिंदू आणि अंधुक दृष्टीची समस्या लवकर येऊ शकते. सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये वयाशी संबंधित ‘मॅक्युलर डिजेनेरेशन’ चा धोका तीन पटीने जास्त असतो. ज्यामुळे वय वाढल्यानंतर डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते, असे डॉ. गाढवे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा सोडवा तंबाखू

धूम्रपान किंवा तंबाखू सोडण्यासाठी तल्लफ येईल तेव्हा भवितव्याबद्दल विचार करा व तुमच्यावर तंबाखूमुळे होणाऱ्या भयंकर रोगांचा परिणाम जाणून घ्या. धूम्रपान किंवा तंबाखूची तल्लफ लागेल तेव्हा काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करा, दोन सिगरेट ओढण्यामध्ये विलंब करा, दीर्घ श्वास घ्या, पाणी प्या, सकारात्मक विचार करा, व्यायाम, योग, चालणे, ध्यानधारणा, नृत्य, संगीत आदी उपययोजना करून पोषक आहार घ्यावा, असा सल्ला डॉ. बळीराम गाढवे यांनी दिला आहे.