नागपूर : “दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहीये…” ही आपल्या देशाची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात असे वक्तव्य केले. त्यांचा नेमका इशारा कोणाकडे होता, हे त्यावेळी सर्वच उपस्थितांच्या लक्षात आले. महान भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री विष्णू गणेश भिडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व्हीएनआयटीच्या मुख्य सभागृहात भिडे स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी गडकरी बोलत कोते. महाराष्ट्र विज्ञान अकादमी, मौतिकशास्त्र परमोशन ट्रस्ट, व्हीएनआयटी आणि भिडे कुटुंबियांच्या वतीने आयोजित केले जाणारे हे १८ वे व्याख्यान होते. भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय संघटन सचिव मुकुल कानिटकर यांनी ‘विज्ञान आणि ज्ञानाचा शाश्वत सातत्य’ या विषयावर व्याख्यान दिले.
अध्यक्षस्थानी व्हीएनआयटीचे प्रा. प्रेमलाल पटेल व प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. व्यासपीठावर व्हीएनआयटीचे माजी संचालक डॉ. प्रमोद पडोळे, व्हीएनआयटीचे भौतिकशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. व्ही. के. देशपांडे होते.आपल्या देशात आजच्या काळात सर्वात मोठी राष्ट्रभक्ती ही होऊ शकते की, आपली आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणे. जर विश्वगुरु बनायचे असेल तरीही हेच आवश्यक आहे. मला वाटते, “दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीये” आणि हीच आपल्या देशाची महत्वपूर्ण गोष्ट आहे. तंत्रज्ञान व विज्ञानात संस्था, वैज्ञानिक त्या दिशेने काम करतील, तर देशाची प्रगती आणि विकासाचा दर तीन पटीने वाढेल.
आज जे दादागिरी करत आहे ते आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळेच. ते दादागिरी करत आहेत, कारण त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे. त्यांच्यापेक्षा चांगले तंत्रज्ञान आपण विकसित करू शकलो, ते तंत्रज्ञान आपल्याकडे आले तर दादागिरी करणारे गप्प बसतील. पण म्हणून आपण त्यांच्यासारखी दादागिरी करायची नाही. विश्वाचे कल्याण हे आपले पहिले ध्येय असले पाहिजे. आपण पहिले विश्वाचे कल्याण करुन विज्ञानाला संस्कृती व मूल्यशी जोडले पाहिजे. कारण संस्कृती जपणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ज्ञान आणि शक्तीचा उपयोग आपण करायला हवा. येणाऱ्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानात उत्क्रांती होईल तरच त्याचा जास्त उपयोग होईल. स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्याच्या आधारावर स्वदेशी तंत्रज्ञानाला विकसित करण्याची क्षमता आपल्या तरुणांमध्ये आहे, असेही गडकरी म्हणाले.