वर्धा : केंद्रीय किंवा राज्याच्या सनदी सेवेत काम करणाऱ्या अधिकारी वर्गास सत्ताधारी वर्गाकडून शाबासकी मिळण्याची बाब अत्यंत दुर्मिळ समजल्या जाते. ते त्यांचे कामच, असा भाव मंत्री व अन्य लोकप्रतिनिधी ठेवून असतात. म्हणून जर एखाद्या अधिकाऱ्यांची जाहीर प्रशंसा खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री करीत असतील तर भुवया उंचावणारच. आज नेमके तसेच झाले. गोडबोल्या नेता असा परिचय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असा कोणीच देत नाही. दादांनी तारीफ केली, असे दाखवा, असे त्यांचेच समर्थक बोलतात. पण जे खरे ते सांगून टाकण्यात दादा मागेपुढे पाहत नाही, अशीही बोलवा. आज मात्र दादांनी खुल्या दिलाने जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांची उभ्या सभागृहात प्रशांसा करीत नवे रूप दाखविले.
दादा आज वर्धा जिल्हा दौऱ्यावर होते. सकाळी आठ वाजता आगमन झाले. जिल्हाधिकारी कक्षात आवडीने नाश्ता केला. नंतर सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. एकाही अधिकाऱ्यास नेहमीप्रमाणे तासले नाही. उलट प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी यांनी केलेले स्वागत स्वीकारलं. पुढे माहिती घेतली.त्यात काही बाबी स्पष्ट झाल्यात. वर्धा जिल्ह्याने युनिक पायाभूत सुविधा आयडी पोर्टलच्या मदतीने या पायलट प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली असून ती अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे कामावर संनियंत्रण करणे अतिशय सोपे झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण राज्यात लागू करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले व या कामाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांची अभिनंदन केले.
संपूर्ण राज्यामध्ये नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनावश्यक खरेदीची कामे घेण्यात आलेली आहेत. परंतु वर्धा जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून अशा प्रकारची खरेदीचे कामांना मान्यता दिली नाही ही उल्लेखनीय बाब आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सेवाग्राम विकास कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आलेली कामे उत्तम दर्जाची होण्यासाठी काळजी घेतल्याचे अधोरेखित केले. त्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.
जिल्ह्यातील विविध विकास कामाचे सर्व समावेशक व सविस्तर सादरीकरण केले. यावरून जिल्ह्यात चांगल्या प्रकारची कामे होत असल्याचे दिसून येते. या त्यामुळे मला लोकप्रतिंधीच्या मागणीनुसार व आवश्यकतेनुसार वाढीव द्यावा लागणार आहे आणि ते देणारच आहे. त्यामुळे या पुढे सुद्धा अशाच प्रकारे उत्तम काम करावे आणि वर्धा जिल्ह्याचा वेगळा ठसा निर्माण करावा असे सांगितले, अशी टिपणी झाल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सांगतात.
जिल्हाधिकारी वान्मथी यांचा जिल्हा कोईम्बतूर. त्या जिल्ह्यात वस्त्र उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. हा संदर्भ देत अजितदादा म्हणाले की हे काम वर्धा जिल्ह्यात झाल्यास शासन सर्व ती मदत करणार. जिल्हाधिकारी वान्मथी यांच्या कार्याची प्रशंसा करतांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणून गेले की राज्यातील पहिल्या पाच जिल्हाधिकाऱ्यात तुमचे नाव आहे. आता दादा तारीफ करून गेले. याबाबत बोलतांना वान्मथी मॅडम म्हणतात की प्रशंसा हा आमच्या कामाचा भाग नाही. होत असेल त्यांचे आभारच. पण आपले काम हे कर्तव्य. ते मीच नव्हे तर सर्वच अधिकारी करतात. सामान्य माणसाचा विकास, याच हेतूने आम्ही सर्व कार्य करतो. तारीफ आणि टीका सहज घेतो.