नागपूर : घराणेशाहीला सर्वच पक्षांचे नेते विरोध करीत असले तरी निवडणुकीत उमेदवारी देण्याची वेळ आल्यावर निवडणूक जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊन पुन्हा राजकीय घराण्यातच उमेदवारी दिली जाते. मराठवाडय़ाप्रमाणेच विदर्भातही नात्यागोत्यांमध्येच उमेदवारी वाटप झाले आहे.
विदर्भात बुलढाण्यापासून गडचिरोली जिल्ह्य़ापर्यंत विविध पक्षांनी केलेल्या तिकीटवाटपावर नजर टाकल्यास घराणेशाहीला सर्वच पक्षांनी स्वीकारल्याचे दिसून येते. काँग्रेसवर कायम घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजप, शिवसेनेतही ती कायम आहे. शिवसेनेने कायम घराणेशाहीला विरोध केला. पण, पक्षप्रमुख उद्धव यांनी त्यांच्या पुत्राला उमेदवारी दिल्यावर त्यांच्या पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या नेत्यांनीही आपल्या आप्तस्वकीयांसाठी उमेदवारी हट्टाने मागून घेतली. राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर (चंद्रपूर) यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने वरोरा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. धानोरकर यांचा राजकीय प्रवास सेना ते काँग्रेस असा आहे. धानोरकर हे वरोऱ्याचे सेनेचे आमदार होते. पक्षाशी मतभेद झाल्यावर त्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करून चंद्रपूर येथून उमेदवारी मिळवली आणि भाजपचे दिग्गज उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव केला.
वध्र्यातील सहकार महर्षी बापूरावजी देशमुख घराण्यातील तिसऱ्या पिढीतील समीर देशमुख या वेळी राष्ट्रवादीऐवजी शिवसेनेकडून देवळी मतदारसंघातून लढत आहेत. समीर यांचे वडील सुरेश देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत.
बुलढाणा जिल्ह्य़ातील खामगावचे भाजपचे विद्यमान आमदार आकाश फुंडकर हे भाजपनेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र आहेत. त्यांना या वेळी भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. धामणगाव रेल्वेचे भाजपनेते आणि विद्यमान विधान परिषद सदस्य अरुण अडसड यांचे पुत्र प्रताप यांना या वेळी उमेदवारी देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील अहेरी मतदारसंघात तर दोन राजघराण्यातच पारंपरिक लढत होते. अहेरीचे भाजप विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री अंबरीशराजे आत्राम हे माजी आमदार सत्यवानराव आत्राम यांचे पुत्र आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी आहे.
अमरावतीच्या राष्ट्रवादी समर्थित खासदार नवनीत राणा यांचे पती आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा पुन्हा रिंगणात आहेत. बडनेरा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती यांना सेनेने रिंगणात उतरवले आहे. मेळघाटमध्ये भाजपचे उमेदवार रमेश मावस्कर हे माजी आमदार पटल्या गुरुजी यांचे पुत्र आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे उभे असलेले माजी आमदार केवलराम काळे यांचे वडील तरू काळे हे काँग्रेसचे आमदार होते. चिमूर मतदारसंघातून या वेळी काँग्रेसतर्फे रिंगणात असलेले सतीश वारजूरकर हे काँग्रेसचे माजी आमदार व डॉ. अविनाश वारजूरकर यांचे भाऊ आहेत. वध्र्याचे काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे हे काँग्रेसचे माजी आमदार व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे पुत्र आहेत.
देवळीचे काँग्रेसचे विद्यमान आमदार रणजित कांबळे हे काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांचे भाचे आहेत. आर्वीतून रिंगणात असलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार अमर काळे हे या पक्षाचे माजी आमदार शरद काळे यांचे पुत्र आहेत. तिवसा मतदारसंघातून रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार व प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर या माजी आमदार भाऊसाहेब ठाकूर यांच्या कन्या आहेत.
काँग्रेसचे चिखलीचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा), सावनेरमधून लढणारे काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार यांचीही पाश्र्वभूमी ही राजकीय घराणेशाहीची आहे.
मुख्यमंत्र्यांविरोधात आशीष देशमुख : नागपूरमध्ये दक्षिण-पश्चिम या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख यांनी यावेळी काँग्रेसच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध रिंगणात उडी घेतली आहे. ते काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख यांचे पुत्र आहेत. आशीष यांनी २०१४ ची निवडणूक भाजपच्या चिन्हावर काटोल येथून लढवली होती आणि ते विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपचा त्याग करून लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.